पुढारी ऑनलाईन डेस्क : वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या श्रीलंकाविरूद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 8 बाद 357 धावा केल्या.यामध्ये शुभमन गिलने सर्वाधिक 92 धावांची खेळी खेळली. तर विराट कोहलीने 88 आणि श्रेयस अय्याकने 82 धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने पाच बळी घेतले. (India vs Sri Lanka)
सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहलीने सलामीवीर शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागिदारी केली. मधुशंकाने या भागिदारीला फोडली. त्याने 92 धावांवर शुभमनला यष्टिरक्षक कुसल मेंडिस करवी झेलबाद केले. शुभमन 92 चेंडूत 92 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. यानंतर विराटही बाद झाला. मधुशंकाने त्याला निसांका करवी झेलबाद केले. विराटने 94 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने 88 धावांची खेळी केली.
यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने 46 चेंडूत 60 धावांची शानदार भागीदारी केली. राहुल 19 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. त्याला दुष्मंथा चमीराने बाद केले. सूर्यकुमार यादव काही विशेष करू शकला नाही. तो नऊ चेंडूत 12 धावा करून बाद झाला. दरम्यान, श्रेयसने एकदिवसीय कारकिर्दीतील 16 वे अर्धशतक झळकावले. त्याने 36 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या.
मधुशंकाने श्रेयसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तो ५६ चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ८२ धावा करून बाद झाला. मोहम्मद शमी दोन धावा करून बाद झाला. त्याचवेळी रवींद्र जडेजाने 24 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 35 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून मधुशंकाने पाच, तर चमीराला एक विकेट मिळाली. तर मोहम्मद शामी आणि रवींद्र जडेजा धावबाद झाले.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा आतापर्यंतचा प्रवास अविस्मरणीय राहिला आहे. टीम इंडियाने सर्व सहा सामने जिंकले असून, गुणतालिकेत 12 गुण आहेत. ही विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. या स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडचा पराभव केला आहे. (India vs Sri Lanka)
श्रीलंका संघाने या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत दोन विजय मिळवले आहेत. तसेच नेदरलँड आणि इंग्लंडचा पराभव केला आहे. या संघाला दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हेही वाचा :