पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे. याबाबत अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेचे मुख्यालय 'पेंटॅगॉन'चे माजी अधिकारी मायकेल रुबिन यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. याबाबतचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. ( India-Canada Row )
…हे एखाद्या मुंगीने हत्तीशी लढा देण्यासारखे आहे
कॅनडाच्या आरोपांवर पेंटागॉनचे माजी अधिकारी आणि अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ सहकारी मायकेल रुबिन यांनी म्हटले आहे की, " हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर कॅनडा आणि भारत याच्यात सुरु असलेल्या तणावावर भारतापेक्षा कॅनडासाठी खूप मोठा धोका आहे. कॅनडाला या प्रकरणी खरच आरोप करायचे असतील तर स्पष्टपणे आणि ठोस पुराव्याच्या आधारावर करावेत. हे एखाद्या मुंगीने हत्तीशी लढा देण्यासारखे आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणाराा देश आहे. कॅनडाच्या तुलनेत हे धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे." ( India-Canada Row )
मायकेल रुबिन म्हणाले की, 'हरदीप सिंग निज्जर हा सभ्य माणूस नव्हता. त्याचा अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग होता. ओसामा बिन लादेन जसा बांधकाम अभियंता होता तसाच हरदीपसिंग निज्जरही प्लंबर होता. परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, आम्ही आंतरराष्ट्रीय दडपशाहीच्या विरोधात आहोत पण ते असे म्हणत असतील तर आम्ही दांभिक आहोत कारण हा आंतरराष्ट्रीय दडपशाही नसून हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे. कासिम सुलेमानी किंवा ओसामा बिन लादेनसोबत अमेरिकेने जे केले तेच भारताने कॅनडामध्ये केले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रुबिन म्हणाले की, 'कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी पुरावे न देता आरोप केले आहेत. आता ते आरोप मागेही घेऊ शकत नाहीत. त्यांना पुरावे सादर करावे लागतील. निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे सिद्ध झाले नाही तर एका दहशतवाद्याला आश्रय का दिला, याचेही उत्तरही त्यांना द्यावे लागले.
अमेरिका दोन मित्रांपैकी एकाची म्हणजे भारताची निवड करेल
अमेरिकेला दोन मित्रांपैकी म्हणजे कॅनडा किंवा भारतापैकी एकाला निवडावा लागेल, परंतु असे झाल्यास भारताची निवड केली जाईल. कारण निज्जर हा एक दहशतवादी होता. हा भारत आणि अमेरिका दोघांसाठी धोका आहे. भारत आणि अमेरिका संबंध फार महत्त्वाचे आहेत. जस्टिन ट्रुडो हे जास्त काळ कॅनडाचे पंतप्रधान राहणार नाहीत आणि अशा परिस्थितीत त्यांच्या जाण्यानंतर आपण पुन्हा संबंध दृढ करू शकतो, असेही मत रुबिन यांनी व्यक्त केले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आता खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी नवा दावा केला आहे. यापूर्वी त्यांनी निज्जर हत्या प्रकरणी कोणतेही पुरावे न देता कॅनडाचे पंतप्रधान या हत्येशी भारताचा संबंध जोडला होता. त्यांनी पुन्हा एकदा असाच प्रयत्न केला आहे. ( India-Canada Row )ओटावा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रुडो म्हणाले की, खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमागे भारतीयाचा सहभाग असल्याचा पुरावा कॅनडाने काही आठवड्यांपूर्वीच नवी दिल्लीतील यंत्रणेला दिला होता. आम्ही काही आठवड्यांपूर्वी भारतासोबत गुप्तचर माहिती शेअर केली होती. आम्हाला भारतासोबत सकारात्मक विचााराने सहकार्य ठेवायचे आहे. आम्हाला आशा आहे की ते आम्हाला सहकार्य करतील. या अत्यंत गंभीर प्रकरणाच्या पाळेमुळे शोधण्यास त्याचेही सहकार्य लाभेल, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान ट्रुडो यांनी १८ सप्टेंबर रोजी कॅनडाच्या संसदेला संबोधित करताना, निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कोणतेही पुरावे सादर न करता केला होता. भारताने हे आरोप फेटाळून लावले असून, ते निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :