Tilak Verma : तिलक वर्माचे संस्मरणीय पदार्पण, रचले ‘हे’ विक्रम! (Video)

Tilak Verma : तिलक वर्माचे संस्मरणीय पदार्पण, रचले ‘हे’ विक्रम! (Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन नव्या खेळाडूंनी भारतीय संघासाठी पदार्पण केले. जिथे मुकेश कुमारने कसोटी आणि एकदिवसीय नंतर टी-20 मध्ये आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. दुसरीकडे, मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये चमक दाखवल्यानंतर तिलक वर्मानेही (Tilak Verma) भारतीय संघासाठी संस्मरणीय पदार्पण केले. या सामन्यात टीम इंडियाचा जरी पराभव झाला असला तरी या दोन खेळाडूंनी संघ व्यवस्थापनाला सुटकेचा नि:श्वास सोडण्याची संधी नक्कीच दिली आहे.

तिलक वर्माने षटकार लगावत खाते उघडले

तिलक वर्माने (Tilak Verma) त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसऱ्याच चेंडूवर शानदार षटकार ठोकला आणि आपले खाते उघडले. यानंतर पुन्हा अल्झारी जोसेफच्या पुढच्या चेंडूवर जोरदार प्रहार करत तो थेट सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी पाठवला. फलंदाजीतील त्याची आक्रमकता पाहुन सारे अवाक तर झालेच पण आपल्या डावातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकल्यानंतर त्याचे नाव एका विशेष यादीत समाविष्ट झाले. त्याची इनिंग पाहिल्यानंतर कोणी त्याची तुलना सिक्सर किंग युवराज सिंग सोबत, तर कोणी मिस्टर परफेक्शनिस्ट सुरेश रैनाशी करत आहेत. तिलकने 22 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 39 धावांची खेळी साकारली. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट 177.27 होता. कोणत्याही भारतीय खेळाडूची टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणातील ही पाचवी सर्वोच्च धावसंख्या आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पणात सर्वाधिक धावा (भारत)

अजिंक्य रहाणे : 61 धावा (विरुद्ध इंग्लंड, 2011)
ईशान किशन : 56 धावा (विरुद्ध इंग्लंड, 2021)
मुरली विजय : 48 धावा (विरुद्ध द. आफ्रिका, 2010)
एस. बद्रीनाथ : 43 धावा (विरुद्ध वेस्ट इंडीज, 2011)
तिलक वर्मा : 39 धावा (विरुद्ध वेस्ट इंडीज, 2023)

पदार्पणातील स्ट्राईक रेटमध्ये तिलक अव्वल

तिलक वर्माने (Tilak Verma) 22 चेंडूत 177.27 च्या स्ट्राईक रेटने 39 धावा फटकावल्या. यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. रोमारियो शेफर्डने त्याला शिमरॉन हेटमायरच्या हाती झेलबाद केले. यासह तो टी-20 पदार्पणात सर्वाधिक स्ट्राइक रेट (किमान 30 धावा) असलेला भारतीय फलंदाज बनला.

इशान किशनने 14 मार्च 2021 रोजी इंग्लंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात त्याने 32 चेंडूत 175 च्या स्ट्राईक रेटने 56 धावा केल्या होत्या. त्यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले होते. तर अजिंक्य रहाणेने 31 ऑगस्ट 2011 रोजी मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यात त्याने 39 चेंडूत 156.41 च्या स्ट्राईक रेटने 61 धावा केल्या. त्यादरम्यान त्याने 8 चौकारही मारले होते.

तिलकने केली द्रविड, सूर्यकुमार आणि मुरली विजयशी बरोबरी

तिलक वर्माने आपल्या पदार्पणाच्या टी-20 सामन्यात 3 षटकार मारून राहुल द्रविड, मुरली विजय आणि सूर्यकुमार यादव यांची बरोबरी केली. राहुल द्रविड, मुरली विजय आणि सूर्यकुमार यादव यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात प्रत्येकी तीन षटकार ठोकले, तर इशान किशन या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे ज्याने आपल्या पदार्पणाच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4 षटकार मारले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news