IND vs WI 1st T20 : पहिल्याच सामन्यात भारत पराभूत

IND vs WI 1st T20
IND vs WI 1st T20
Published on
Updated on

त्रिनिदाद : वृत्तसंस्था भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताच्या कागदी वाघांनी फलंदाजीत हाराकिरी केल्यामुळे 4 धावांनी पराभूत व्हावे लागले. विंडीजने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे 150 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान भारत सहज पार करेल, असे वाटत होते; परंतु विंडीजच्या गोलंदाजीपुढे भारताचे रथी-महारथी ढेर झाले. संथ खेळपट्टीवर भारताची अवस्था 18 षटकांत 7 बाद 129 धावा अशी झाली होती. यानंतर अर्शदीप सिंगने दोन चौकार मारून थोडी आशा निर्माण केली; परंतु विंडीजच्या शेफर्डने शेवटच्या षटकांत 10 धावांचे रक्षण करताना 6 धावा देत सामना जिंकून दिला. (IND vs WI 1st T20)

फलंदाजांपैकी पदार्पण करणार्‍या तिलक वर्माने सर्वाधिक 39 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 21 धावा केल्या. बाकीच्या फलंदाजांनी निराशा केली. विंडीजकडून मॅकॉय, होल्डर आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या वेस्ट इंडिजने डावाची भन्नाट सुरुवात केली. ब्रेंडन किंग जोमात होता, पण यावेळी भारतीय संघात पुनरागमन करणार्‍या यजुवेंद चहलने यावेळी किंगच्या या खेळीला खीळ बसवली. चहलने यावेळी आपल्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर कायले मेयर्सला बाद केले. मेयर्सला यावेळी फक्त एकच धाव करता आली. त्यानंतर तिसर्‍याच चेंडूवर चहलने किंगला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. चहलने त्याला पायचित पकडले. किंगने 19 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 29 धावांची खेळी साकारली. (IND vs WI 1st T20)

चहलने फक्त तीन चेंडूंत भारताला दोन विकेटस् मिळवून दिल्या. चहलनंतर कुलदीपने भारताला तिसरे यश मिळवून दिले. कुलदीपने जॉन्सन चार्ल्सला तीन धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर निकोलस पूरन आणि कर्णधार रोव्हमन पॉवेल यांनी भारताच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायला सुरुवात केली. पूरन चांगल्या फॉर्मात होता. त्याने मुंबई इंडियन्सला मेजर क्रिकेट लीगच्या अंतिम फेरीत एकहाती विजय मिळवून दिला होता. त्याचा हा फॉर्म त्याने संघासाठी पुढे ठेवला, पण हार्दिक पंड्याने आपल्या चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर पूरनला बाद केले. पूरनने यावेळी 34 चेंडूंत 2 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 41 धावांची खेळी साकारली. पूरन बाद झाला आणि त्यानंतर पॉवेलने धडाकेबाज फटकेबाजी करायला सुरुवात केली. भारताकडून वेस्ट इंडिजच्या कर्णधाराला दोनदा जीवदान दिले. पॉवेल 18 धावांवर असताना कुलदीपच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने त्याला जीवदान दिले. त्यानंतरच्या हार्दिक पंड्याच्या षटकात यजुवेंद्र चहलने पॉवेलला 20 धावांवर असताना जीवदान दिले. त्याला अर्शदीप सिंगने बाद केले. पॉवेलने 32 चेेंडूंत 48 धावा केल्या. पूरन आणि पॉवेल यांच्या योगदानाच्या जोरावर वेस्ट इंडिजने 20 षटकांत 6 बाद 149 धावा केल्या. भारताकडून यावेळी यजुवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. (IND vs WI 1st T20)

तिलक की झलक, सबसे अलग (IND vs WI 1st T20)

मुंबई इंडियन्सकडून आयपीएल गाजवणार्‍या एन. तिलक वर्मा याला भारतीय टी-20 संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. भारत या सामन्यात पराभूत झाला असला तरी तिलक वर्माने आपल्या फलंदाजीची चांगली झलक दाखवली. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने अल्झारी जोसेफचा पहिल्याच चेंडू मैदानाच्या बाहेर भिरकावला. यावेळी जोसेफचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता, पण तिलक वर्मा एवढ्यावरच थांबला नाही, त्याने पुढच्या चेंडूवरही षटकार ठोकला. शेफर्डच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने 22 चेंडूंत 39 धावा केल्या यात त्याचे 2 चौकार आणि 3 षटकार होते. तत्पूर्वी क्षेत्ररक्षणातही त्याने चुणूक दाखवली. त्याने जेसन चार्लस आणि निकोलस पूरन यांचे झेल घेतले. (IND vs WI 1st T20)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news