पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India WTC Points Table : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत पाऊस खलनायक ठरला. पोर्ट ऑफ स्पेन कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला. एकही चेंडू टाकता आला नाही. अशा स्थितीत कसोटी अनिर्णित राहिल्याने भारताला विजयापासून वंचित रहावे लागले. मात्र, कसोटी मालिका 1-0 ने जिंकून टीम इंडियाने डब्ल्यूटीसीच्या तिस-या पर्वाची शानदार सुरुवात केली आहे. भारताने डॉमिनिका येथील पहिल्या कसोटीत एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला होता. आता उभय संघांदरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. वनडे मालिकेतील पहिला सामना 27 जुलै रोजी बार्बाडोस येथे होणार आहे.
दुसऱ्या कसोटीत भारताने आपल्या पहिल्या डावात 438 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 255 धावांवर आटोपला. अशा स्थितीत टीम इंडियाला 183 धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसरा डाव 2 बाद 181 धावा करून घोषित केला आणि एकूण 364 धावांची आघाडी घेतली. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला 365 धावांचे लक्ष्य मिळाले. रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा कॅरेबियन संघाने 2 बाद 76 धावा केल्या होत्या. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी त्यांना 289 धावांची गरज होती. त्याचवेळी भारताला विजयासाठी आठ विकेट्स मिळवणे आवश्यक होते. मात्र, पावसामुळे शेवटच्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. अखेर हा सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघामधील ही 100 वी कसोटी होती. त्यामुळे या ऐतिहासिक कसोटीत विजयाने हुलकावणी दिल्याने रोहित सेनेचा स्वप्न भंग झाला. (Team India WTC Points Table)
पाचव्या दिवशी (सोमवारी) पावसाने कहर केला. तत्पूर्वी रविवारीही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे पाचव्या दिवशी सामना अर्धा तास आधी नियोजित करण्यात आला. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार होता, पण मुसळधार पाऊस पडत असल्याने भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 च्या सुमारास लंच टाईम घोषित करण्यात आला. तोपर्यंत पाऊस थांबला होता आणि खेळपट्टीवरील कव्हर्स काढण्यात आले. सामना सुरू होईल असे वाटत असतानाच पुन्हा पावसाल सुरुवात झाली आणि खेळपट्टी कव्हर्सने झाकण्यात आली. यादरम्यान अनेकवेळा असे घडले की कव्हर काढले गेले आणि लगेचच पाऊस सुरू झाला. अशा स्थितीत रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा केल्यानंतर पंचांनी पाचव्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची सलग नववी कसोटी मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने 2002 मध्ये विंडिजविरुद्ध शेवटची कसोटी मालिका गमावली होती. तेव्हा यजमान विंडीजने भारतीय संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर 2-1 ने मात दिली होती. यानंतर टीम इंडियाने वर्चस्व राखले असून सलग नऊ मालिका जिंकल्या आहेत. त्याचबरोबर वेस्ट इंडिजच्या मैदानावर टीम इंडियाचा हा सलग पाचवा कसोटी मालिका विजय ठरला आहे. भारताने 2019 मध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने, 2016 मध्ये चार सामन्यांची मालिका 2-0 ने, 2011 मध्ये तीन सामन्यांची मालिका 1-0 ने तर 2006 मध्ये चार सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली होती.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन पर्वातील (2023-25) ही भारताची पहिली कसोटी मालिका होती. पहिली कसोटी जिंकून भारताचे 12 गुण मिळवले. कसोटी जिंकल्यास संघाला 12 गुण मिळतात, तर बरोबरीत सहा गुण मिळतात आणि अनिर्णित झाल्यास चार गुण मिळतात. अशा स्थितीत शेवटच्या दिवशी पावसाचा सर्वाधिक फटका भारताला बसला, कारण संघाला विंडिजसोबत चार गुण शेअर करावे लागले. त्यामुळे आता डब्ल्यूटीसीच्या पॉईंट टेबलमध्ये भारताची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. टीम इंडियाच्या गुणांची टक्केवारी 66.67 आणि गुण 16 झाले आहेत. त्याचवेळी पाकिस्तानने 100 गुणांच्या टक्केवारीसह एक विजय आणि 12 गुणांसह पहिले स्थान गाठले आहे. ऑस्ट्रेलिया 26 गुण आणि 54.17 पॉइंट टक्केवारीसह तिसर्या आणि इंग्लंड 14 गुण आणि 29.17 पॉइंट टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे.
WTC पॉईंट टेबलमध्ये गुणांच्या टक्केवारीला महत्त्व दिले जाते. अशा प्रकारे संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. पाकिस्तान संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. त्यांनी पहिली कसोटी जिंकली असून दुस-या कसोटीही विजय मिळवल्यास ते टीम इंडियाला मागे टाकून पुढे जाण्याची शक्यता आहे. पण हा सामना अनिर्णित राहिला तर पाकिस्तानच्या विजयाची टक्केवारीही कमी होईल. त्यामुळे भारतीय संघ पुन्हा पुन्हा एकदा अव्वल स्थानावर विराजमान होण्याची दाट शक्यता आहे.