IND vs WA XI : ऑस्ट्रेलियन स्थानिक संघाकडून टीम इंडियाचा 36 धावांनी पराभव!

IND vs WA XI : ऑस्ट्रेलियन स्थानिक संघाकडून टीम इंडियाचा 36 धावांनी पराभव!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी 20 वर्ल्ड कप पूर्वी भारतीय संघाचा सराव सामन्यात मोठा पराभव झाला आहे. आज (दि. 13) पर्थ येथे खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणा-या टीम इंडियाला वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने 36 धावांनी मात दिली. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या मातब्बर फलंदाजांची दमछाक झाली. संघ सात विकेट्स गमावून 132 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताकडून कर्णधार राहुलने सर्वाधिक 74 धावा केल्या. राहुलशिवाय बाकीच्या फलंदाजांनी निराशा केली. गोलंदाजांमध्ये अश्विनला तीन आणि हर्षलला दोन बळी मिळाले. या सामन्यात सूर्यकुमार यादव, विराट कोहली आणि युझवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली होती. (IND vs WA XI India lost T20 match against Western Australia by 36 runs in Perth)

भारत आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हन (IND vs WA XI) यांच्यातील दुसरा सराव सामना गुरुवारी 13 ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये खेळला गेला. या टी-20 सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 च्या भारतीय संघाच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. येत्या दोन सराव सामन्यांमध्ये आणि त्यानंतर 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोणती रणनीती अवलंबावी लागेल, याचे धडे संघाला गिरवावे लागतील असे अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताला 36 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. केएल राहुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा स्थितीत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इलेव्हनने 20 षटकांत 8 गडी गमावून 168 धावा केल्या. अर्शदीप सिंगने आपल्या पहिल्याच षटकात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मात्र यानंतर निक हॉब्सन (64 धावा) आणि डार्सी शॉर्ट (52) यांनी मजबूत भागीदारी रचली. दोन्ही खेळाडूंनी अर्धशतके ठोकली. पण हर्षलने हॉबसनला बाद केल्यावर त्याच षटकात शॉर्टही धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर अश्विनने एकाच षटकात तीन विकेट घेत भारताचे सामन्यात पुनरागमन केले. यानंतर अर्शदीपने 18व्या षटकात 8 धावा दिल्या आणि भुवीने 19व्या षटकात 7 धावा दिल्या. हर्षलने शेवटच्या षटकात 13 धावा देत आणखी एक विकेट घेतली. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीवीर ऋषभ पंत 9 धावांवर बाद झाला. यानंतर दीपक हुड्डा (6), हार्दिक (17), अक्षर (2) आणि दिनेश कार्तिक (10) धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. प्लेइंग इलेव्हनचा भाग असलेला रोहित शर्मा फलंदाजीला आला नाही. भारताकडून आर अश्विनने तीन बळी घेतले आणि हर्षल पटेललाही दोन यश मिळाले, पण एका बाजूने विकेट पडत राहिल्याने भारतीय संघासमोर 169 धावांचे लक्ष्य मोठे ठरले. कर्णधार केएल राहुलने 55 चेंडूत 74 धावांची खेळी खेळली, मात्र त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. त्यामुळे भारताचा संघ 20 षटकांत केवळ 132 धावा करू शकला आणि 36 धावांनी सामना गमावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news