IND vs SA : टीम इंडियाला आफ्रिकन चॅलेंज; डर्बनच्या मैदानावर आज पहिला टी-२० सामना

RSA vs IND 1st T20I
RSA vs IND 1st T20I

डर्बन; वृत्तसंस्था : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघ पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर गेला असून, २८ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात रविवारी (दि. १०) टी-२० सामन्याने होत आहे. हा सामना डर्बनच्या किंग्समेड क्रिकेट स्टेडियमवर होणार असून, भारतीय संघ या मालिकेत पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. संघात युवा खेळाडूंचा भरणा असला, तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आराम करणारे शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा हे संघात परतले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व एडन मार्कराम याच्याकडे आहे. (IND vs SA)

तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली नाहीत, तरीही भारताला सेट प्लेईंग इलेव्हन निवडताना डोके खाजवावे लागणार आहे. आफ्रिका दौऱ्यावरील टी-२० मालिकेतील संघात ३ सलामीवीर, मधल्या फळीतील ६ फलंदाज, ४ फिरकीपटू व ४ जलदगती गोलंदाज आहेत. यातून कोणाला अंतिम ११ मध्ये खेळवायचे, हा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे. (IND vs SA)

गिल व जडेजा पहिल्या सामन्यापूर्वी संघात दाखल होतील; पण पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हन निवडताना चांगलीच डोकेदुखी होणार आहे. सलामीच्या दोन जागांसाठी यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड व शुभमन गिल यांच्यात शर्यत आहे. मधल्या फळीत तिलक वर्मा, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग हे पर्याय आहेत. यापैकी सूर्या, श्रेयस व इशान यांचे स्थान पक्के आहे. रिंकू सिंगलाही संधी मिळेल. जितेशल वाट पाहावी लागू शकेल. रवींद्र जडेजा उपकर्णधार आहे. रवी बिष्णोईन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कुलदीप यादवनेही सातत्य राखले आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या वाट्याला पुन्हा बाकावरच बसून राहण्याची वेळ येणार आहे. दीपक चहरच्या न येण्याने जलदगती गोलंदाजांमधील स्पर्धा कमी झाली आहे.

पिच रिपोर्ट

डर्बनच्या किंग्समेडची खेळपट्टी जगातील सर्वात वेगवान समजली जाते. येथे वेगवान गोलंदाजाची हवा असते. परंतु, धावाही मोठ्या प्रमाणात होतात. तीन महिन्यांपूर्वी येथे ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामने झाले. यात तीनवेळा १९० च्या पुढे धावा झाल्या होत्या. येथे पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ १८० च्या पुढे धावा करू शकला, तर त्यांना विजयाची जास्त संधी असते. येथे पहिल्यांदा खेळणाऱ्या संघाची १५३ सरासरी आहे. (IND vs SA)

हवामानाचा अंदाज

भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामन्यावर पावसाचे संकट आहे. रविवारी डर्बनमध्ये दिवसभरात पाऊस पडण्याची ६० ते ७० टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सामना बाधित होऊ शकतो.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news