पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथे खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने पहिल्या डावात आठ गडी गमावून 473 धावा केल्या आहेत. सध्या कुलदीप यादव 27 धावांवर आणि जसप्रीत बुमराह 19 धावांवर नाबाद आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. हे आव्हान पार करून टीम इंडियाने 255 धावांची आघाडी घेतली आहे. (IND vs ENG Test)
शुक्रवारीच्या पहिल्या सत्रात भारताने 30 ओव्हरमध्ये विकेट न गमवता 139 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या सत्रात ( चहापर्यंत) भारताने 24 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 4.67 धावगतीने 112 धावा केल्या.चहापानानंतर तिसऱ्या सत्रात भारताने 36 षटकांत 5 विकेट गमावून 97 धावा केल्या. (IND vs ENG Test)
गुरुवारी यशस्वी जैस्वाल 57 धावा करून बाद झाला. भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात एका विकेटवर 135 धावांवर केली आणि दिवसभर खेळल्यानंतर यामध्ये 338 धावांची भर घातली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी करत भारताला 250 धावांच्या पुढे नेले. रोहितने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 18वे शतक झळकावले आणि शुभमनने चौथे शतक झळकावले. या मालिकेतील दोघांचे हे दुसरे शतक ठरले. ही भागीदारी बेन स्टोक्सने मोडली. नऊ महिन्यांनंतर गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या स्टोक्सने या मालिकेत प्रथमच गोलंदाजी केली आणि पहिल्याच चेंडूवर रोहितला क्लीन बोल्ड केले. रोहितने 162 चेंडूत 13 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 103 धावांची खेळी केली. यानंतर जेम्स अँडरसनने शुभमन गिलला क्लीन बोल्ड केले. गिलला 150 चेंडूत 12 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 110 धावा करता आल्या.
यानंतर सरफराज खान आणि नवोदित देवदत्त पडिक्कल यांनी चौथ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. टी-ब्रेकनंतर इंग्लंडच्या बशीरने आक्रमक गोलंदाजी करत सर्फराजला बाद केले. एकेकाळी भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 376 धावा होती. यानंतर पुढील 52 धावा करताना संघाने पाच विकेट गमावल्या.
सर्फराज बाद झाल्यानंतर पडिक्कलने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो 10 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 65 धावा करून बाद झाला. त्यानंतर ध्रुव जुरेलही 15 धावा करून बाद झाला. या तिघांनाही शोएब बशीरने बाद केले. त्याचवेळी टॉम हार्टलेने रवींद्र जडेजा आणि आर अश्विनला बाद केले. जडेजा 15 धावा करून बाद झाला तर अश्विन खातेही उघडता आले नाही झाला. 52 धावांत पाच गडी गमावल्यानंतर कुलदीप आणि बुमराहने 45 धावांची नाबाद भागीदारी केली आणि 250 च्या पुढे आघाडी घेतली.
तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर आटोपला. यामध्ये कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने 100 वी कसोटी खेळत चार विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. म्हणजे इंग्लंडच्या सर्व 10 विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. (IND vs ENG Test)
फलंदाजीमध्ये डकेट 27 धावा करू शकला. क्रॉलीने 108 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 79 धावा केल्या. जो रूट 26 धावा करून बाद झाला, तर 100वी कसोटी खेळणारा जॉनी बेअरस्टो 29 धावा करून बाद झाला. कुलदीपने कर्णधार बेन स्टोक्सला खातेही उघडू दिले नाही. इंग्लंडची धावसंख्या 175 धावांवर असताना संघाने बेअरस्टो, रूट आणि स्टोक्सच्या विकेट्स गमावल्या. अश्विनने डावाच्या 50 व्या षटकात हार्टली (6) आणि वूड (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर अँडरसनला (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवून इंग्लंडचा डाव 218 धावांवर आटोपला. बशीर 11 धावा करून नाबाद राहिला.
हेही वाचा :