IND vs AUS 2nd T20 : दुसऱ्या टी २० सामन्यात विजय मिळवून भारताने मालिकेत साधली ऑस्ट्रेलियाशी बरोबरी

Most sixes in T20
Most sixes in T20

नागपूर : वृत्तसंस्था मालिका वाचवण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेटस्नी हरवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पावसामुळे हा सामना प्रत्येकी आठ षटकांचा खेळवण्यात आला. त्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 8 षटकांत 90 धावा केल्या. भारताने हेे आव्हान चार चेंंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले. रोहित शर्माने 20 चेंडूंत 46 धावा करताना चार चौकार आणि तितकेच षटकार ठोकले. मालिकेतील तिसरा सामना आता रविवारी हैदराबाद येथे होणार आहे.

48 चेंडूंत 91 धावांचे लक्ष्य असल्यामुळे भारताला सुरुवातही धडाकेबाज हवी होती. हेजलवूडच्या पहिल्याच षटकांत रोहितने दोन आणि राहुलने एक षटकार ठोकून 20 धावा वसूल केल्या. कमिन्सच्या पुढच्या षटकांत 10 धावा आल्या. तिसर्‍या षटकांत झम्पाला रोहितने षटकार ठोकला, परंतु के. एल. राहुलचा त्रिफळा उडवून झम्पाने भारताला पहिला धक्का दिला. 3 षटकांत भारताच्या 40 धावा झाल्या होत्या. राहुलच्या जागी आलेल्या विराट कोहलीने दोन खणखणीत चौकार ठोकले; परंतु झम्पाने त्याचा लेगस्टम्प उडवला. कोहलीने 11 धावा केल्या. झम्पाने पुढच्या चेेंडूवर सूर्यकुमार यादवला शून्यावर पायचित पकडले.

हार्दिक पंड्याने कर्णधार रोहितला साथ देण्याची भूमिका स्वीकारली, पण त्याने जेव्हा हात खोलले त्यावेळी तो 9 धावांवर बाद झाला. शेवटच्या षटकांत दिनेश कार्तिकने आपल्या फिनिशरच्या भूमिकेला न्याय देत षटकार आणि चौकार ठोकून सामना फिनिश केला. नागपुरात शुक्रवारी पाऊस झाल्याने आऊटफिल्ड ओले होते, त्यामुळे सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही. शेवटी हा सामना प्रत्येकी 8 षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला. भारताकडून जसप्रीत बुमराहने या सामन्यातून पुनरागमन केले. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला.

मात्र विराट कोहलीने गेल्या सामन्यातील हिरो कॅमेरून ग्रीनला 5 धावांवर धावबाद केले. त्यानंतर अक्षर पटेलने ग्लेन मॅक्सवेल (0) आणि टीम डेव्हिड (2) यांचा त्रिफळा उडवत कांगारूंची अवस्था 3.1 षटकात 3 बाद 31 धावा अशी केली. अ‍ॅरोन फिंचने 14 चेंडूंत 31 धावा करून एक बाजू लावून धरली होती. मात्र, दुखापतीतून सावरलेल्या जसप्रीत बुमराहने त्याचा यॉर्करवर त्रिफळा उडवत त्याची खेळी संपवली. त्यानंतर मॅथ्यू वेडने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला 6 षटकांत 59 धावांपर्यंत पोहोचवले. बुमराहने सातव्या षटकात 12 धावा दिल्या. त्यानंतर शेवटचे षटक टाकणार्‍या हर्षल पटेलने 19 धावांची खैरात वाटली. मॅथ्यू वेडने त्याच्या शेवटच्या षटकात 19 धावा चोपल्या. वेडने 20 चेंडूंत नाबाद 43 धावा ठोकत ऑस्ट्रेलियाला 8 षटकांत 5 बाद 90 धावांपर्यंत पोहोचवले.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news