शिंदे गटाचा मेळावा कुठे होईल याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार : दीपक केसरकर | पुढारी

शिंदे गटाचा मेळावा कुठे होईल याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार : दीपक केसरकर

मुंबई; पुढारी ऑनलाईन : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होणार असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालायने आज दिला. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून उलट सुलट प्रतिक्रीया येत आहेत. दरम्यान शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी आजच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढला जात असून शिंदे गटाचा मेळावा कोठे होईल याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्षे होतो. अशी टिप्पणी करत शिंदे गटाच्या वतीने आमदार सदा सरवणकर यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तर २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला न्यायालयाने परवानगी दिली आहे. यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर ठाकरे यांना मोठा दिलासा आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार याबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिवसेना, शिंदे गट आणि मुंबई महापालिकेने आपली बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने महापालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरुन नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. यामुळे ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेकडून कायदेतज्ज्ञ आस्पी चिनॉय यांनी, तर सदा सरवणकर यांच्यावतीने जनक द्वारकादास यांनी बाजू मांडली.

दरम्यान, २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी न्यायालयाने ठाकरे यांना परवानगी दिली आहे. तर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारणारा बीएमसीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. पक्षाच्या वादात जाण्यापूर्वी आम्ही स्पष्ट करतो की, खरी शिवसेना कोण यावर आम्ही कोणतेही मत व्यक्त करणार नाही. खरी शिवसेना कोण हा मुद्दा निवडणूक आणि सर्वोच्च न्यायालयासमोर असल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाच्या या निर्णयाचे शिवसेनेकडून स्वागत करण्यात आले आहे. सत्याचा विजय कोर्टात झाला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. या निकालानंतर शिवसैनिकांनी मुंबईतील अनेक भागांत जोरदार घोषणाबाजी केली.

दसऱ्या मेळाव्यावरुन शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष सुरु आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाच्या माध्यमातून केलेले दोन्ही अर्ज महापालिकेने नाकारले होते. गणेश विसर्जनाच्यावेळी शिवसेना अणि शिवसेना शिंदे गटात झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमी या दोन्ही गटांना परवानगी नाकारण्यात आली. दोन्ही गटाला महापालिकेने गुरुवारी सकाळी तसे लेखी कळवले. त्यानंतर हा वाद न्यायालयात गेला होता.

शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने अनिल देसाई यांनी २२ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे अर्ज केला होता, तर त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनीही शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी परवानगीकरता अर्ज दाखल केला होता. हे दोन्ही अर्ज महापालिकेकडे परवनगीच्या प्रतीक्षेत होते.

दरम्यान, शिंदे गटाला वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळाल्यानंतर शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत, उपनेते मिलिंद वैद्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जी उत्तर विभागाकडे याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये जी उत्तर विभागाने या परवानगीबाबत विधी विभागाकडे अभिप्राय मागवण्यात आल्याचे लेखी उत्तर शिवसेनेला दिले होते.

Back to top button