छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उच्च शिक्षित पती-पत्नीतील वादाच्या घटना काही नवीन नाहीत, पण डॉक्टर पतीशी झालेल्या वादानंतर प्राध्यापक पत्नीने चक्क फ्लॅट पेटवून दिल्याचा प्रकार आज (दि.२९) सकाळी ६ वाजता एपीआय कॉर्नरजवळील नालंदा कॉम्पलेक्समध्ये घडला. यात सोफासेट, दोन फ्रिज, एसी, टीव्ही, कुलर, लाकडी कपाट, शोकेस आणि त्यातील वस्तू, कपडे, घराची कागदपत्रे आदी लाखांच्या महागड्या वस्तू खाक झाल्या. Chh. Sambhajinagar News
या प्रकरणी प्राध्यापक पत्नीविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विनिता गोविंद वैजवाडे (रा. फ्लॅट क्र. १२, नालंदा काॅम्पलेक्स, एपीआय कॉर्नर) असे आरोपी प्राध्यापक पत्नीचे नाव आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजीराव तावरे यांनी दिली. Chh. Sambhajinagar News
डॉ. गोविंद सुभाषराव वैजवाडे (४०) हे फिर्यादी आहेत. ते टू बीएचके फ्लॅटमध्ये राहतात. ते खासगी हॉस्पिटलमध्ये काम करतात. २०१९ मध्ये त्यांचे लग्न विनिताशी लग्न झाले. ती एका आयुर्वेद कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. विनिता डॉ. गाेविंद यांच्यावर नेहमी संशय घेते. त्यामुळे दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून पटत नाही. या ना त्या कारणावरून सतत खटके उडतात. २८ जानेवारीला रात्री ११ वाजता दोघांत वाद झाला. त्यांच्यातील वाद काही केल्या थांबत नसल्यामुळे शेजाऱ्यांनी जाऊन दोघांची समजूत घातली, पण वाद काही थांबला नाही. पहाटे दीड वाजता विनिताने घरातून बाहेर नेऊन सोडण्याची विनंती शेजाऱ्यांना केली. त्यांनीही तिच्या सांगण्यावरून तिला एका ओळखीच्या ठिकाणी सोडले. मात्र, २९ जानेवारीला सकाळी ६ वाजताच विनिता नालंदा कॉम्प्लेक्समधील फ्लॅटमध्ये परतली.
पत्नी विनिता घरी येताच पुन्हा जोरजोरात ओरडाओरड करू लागली. त्यामुळे डॉ. गाेविंद हे दार उघडून फ्लॅटमधून खाली आले. विनिताने घरात जावून बॅग भरली. बॅग घेऊन जाताना तिने फ्लॅटलाही आग लावली. विनिता खाली येताच डॉ. गोविंद वर गेले तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते.
घरात पत्नीने आग लावल्याचे लक्षात येताच डॉ. गोविंद यांनी अग्निशामक दलाला फोन केला. ड्युटी इनचार्ज विनायक कदम हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. घरातून ज्वाळा निघत असल्याचे दिसताच त्यांनी आग आटोक्यात आणण्याासाठी प्रयत्न सुरु केले. त्याचवेळी पद्मपुरा आणि सिडकोतील बंब मागवून घेतले. तब्बल अडीच तासाच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. या प्रकरणी अधिक तपास हवालदार भिडे करीत आहेत.
हेही वाचा