अकोला; पुढारी वृत्तसेवा : सासू-सुनेचे नाते देखील प्रसंगी आई- मुलीच्या नात्यात रुपांतरीत होऊ शकते. सर्वत्र भांडणे, कटकटी होत असतात. अशा समजाला छेद देणारे प्रसंग समाजात घडत असतात. सासू आई बनून विधवा सुनेचे कन्यादान करते. असाच एक विवाह सोहळा अकोल्यात पार पडला आहे. सासूने सुनेचे कन्यादान करून कृतीतून आदर्श घालून दिला.
महेंद्र पेठकर आणि स्वाती बाहेकर यांच्या विवाहाला मोजके पाहुणे उपस्थित होते. भावसार क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष अनिल मावळे आणि पदाधिका-यांची अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकोल्याच्या पार्वती नगरात राहणारे धनंजय बाहेकर यांचा तीन वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला होता. धनंजय यांच्या पश्चात आई लता, पत्नी स्वाती आणि दोन लहान मुले आहेत. मुलगा धनंजय गेल्यावर सासूने सुनेचा मुलीप्रमाणे सांभाळ केला. तसेच तिच्यापुढे संपूर्ण आयुष्य असल्याचा विचार करून तिचा पुनर्विवाह लावून द्यावा, असे त्यांच्या मनात आले. हा विषय त्यांनी भावसार समाजाचे अध्यक्ष अनिल मावळे यांना सांगितला. मावळे आणि सहका-यांनी काही स्थळे त्यांना सुचवली. आणि लोणी येथील महेंद्र पेठकर व कुटुंबीयांनी स्वातीचा स्वीकार करण्यास सहमती दिली.
पेठकर हे सध्या खामगावला नोकरी निमित्त स्थायिक आहेत. दोघांचाही विवाह दोन दिवसांपूर्वी हिंगलाज माता मंदिर, भावसार पंच बंगला येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. मुलाचे मामा म्हणून नारायण सा. सराग तर मुलीचे मामा म्हणून मुरलीधर सा. ताकवाले यांनी भूमिका बजावली. भावसार समाजाचे उपाध्यक्ष रवींद्र सराग, सुभाष नवलाखे, डिगांबर गढे, नितीन नागलकर, विजय जुनगडे, श्रीकृष्ण मानमोडे, महादेव नंदाने, सचिन नंदाने, नितीन ताकवाले, बाळकृष्ण बिडवई महाराज यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
आई म्हणून जबाबदारी स्विकारली
लता पुरणसा बाहेकर यांनी सुनेच्या पुनर्विवाहाच्या निर्णयाला समाजातून विरोध झाला. परंतु, भावसार क्षत्रीय समाजाच्या पदाधिका-यांनी लताबाईंच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यामुळे सासूकडून सुनेचे कन्यादान होऊ शकले. स्वातीच्या जीवनाला नवी दिशा मिळाली असे म्हटले आहे.
महेंद्रने स्वातीसह दोन मुलांना स्वीकारले
स्वातीसोबत लग्न गाठ बांधणा-या महेंद्र पेठकर यांचा पहिलाच विवाह आहे. परंतु, त्यांनी स्वातीच्या दोन मुलांना स्वीकारले. त्यांनीही कृतीतून आदर्श घालून दिला. त्यांच्या कृतीला उपस्थितांनी दाद दिली. सुनेला सासरी पाठवताना सासूचे डोळे पाणावले.
हेही वाचलंत का?