पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभा निवडणुकीत आमचे तिन्हीही उमेदवार निवडून येणार आहेत. आम्हाला घोडेबाजार करायचा नाही, त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, आमचे तीन आणि त्यांचे तीन, त्यांनी एक उमेदवार मागे घेतल्यास घोडेबाजार होणार नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (दि.३०) येथे दिली.
राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांचे अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर फडणवीस Devendra Fadnavis यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार ठेवला, तरी काही फरक पडणार नाही, भाजपचे तिन्हीही उमेदवार निवडून येणार आहेत. तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील असून राजकारणात सक्रीय आहेत. मला पूर्ण विश्वास आहे, सद्सद्वविवेक बुद्धीने काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत. निश्चित आमचे उमेदवार निवडून येतील. निश्चित आम्ही विचार करून निवडून आणण्यासाठीच
तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, संख्याबळ पाहता भाजप २, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ उमेदवार विजयी होणार आहे. तर सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार चुरस होणार आहे. भाजपचे कोल्हापूरचे उमेदवार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे कोल्हापूरचे उमेदवार संजय पवार यांच्यामध्येच लढत होणार आहे.
हेही वाचलंत का ?