गुजराती, राजस्थानींना मुंबईतून काढले तर इथे एक पैसाही…, राज्यपालांच्या वक्तव्यावरुन नवा वाद

गुजराती, राजस्थानींना मुंबईतून काढले तर इथे एक पैसाही…, राज्यपालांच्या वक्तव्यावरुन नवा वाद
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गुजराती आणि राजस्थानींना महाराष्ट्रातून, विशेषतः मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकले तर इथे एक पैसाही शिल्लक राहणार नाही. तसेच मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहू शकणार नाही, असा दावा भगतसिंह कोश्यारी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

राज्यपालांचे वक्तव्य हे मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. "महाराष्ट्रात भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे…राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे." असे संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे. १०५ मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे …ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा..दिल्ली पुढे किती झुकताय?, असा सवाल त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसली जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय. महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केली आहे.

राज्यपालांच्या वक्तव्यामुळे मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये. गुण्यागोविंदाने राहा, असा शब्दांत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news