WTC : पाकचा दारुण पराभव केल्यानंतर श्रीलंकेने पुन्हा पटकावले तिसरे स्थान!

WTC : पाकचा दारुण पराभव केल्यानंतर श्रीलंकेने पुन्हा पटकावले तिसरे स्थान!

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेने गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 246 धावांनी पराभव केला. यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. श्रीलंकेच्या या दणदणीत विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2021-23 च्या पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. श्रीलंकेने WTC गुणतालिकेत पुन्हा तिसरे स्थान पटकावले असून पाकिस्तान तीनवरून पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. भारताचे चौथे स्थान कायम आहे.

WTC गुणतालिकेत श्रीलंकेची विजयाची टक्केवारी 53.33 आहे आणि एकूण 64 गुण आहेत. त्याच वेळी, अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 71.43 आहे. ऑस्ट्रेलिया 70 टक्केवारीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळताना दक्षिण आफ्रिकेकडे गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखण्याची सुवर्णसंधी आहे. भारत 52.08 गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. तर वेस्ट इंडिज सहाव्या, इंग्लंड सातव्या, न्यूझीलंड आठव्या आणि बांगलादेश नवव्या स्थानावर आहे.

श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्धची दुसरी आणि अंतिम कसोटी 246 धावांनी जिंकून दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. पाकिस्तानने पहिला कसोटी सामना 4 विकेटने जिंकला होता. दुसऱ्या कसोटीत यजमान श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्व गड्यांच्या मोबदल्यात 378 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 231 धावांत आटोपला. यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करताना 8 गडी गमावून 360 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या डावात धनंजया डी सिल्वाने 109 धावा केल्या. 508 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 261 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 81 धावा केल्या. धनंजया डी सिल्वाला 'प्लेअर ऑफ द मॅच' तर प्रभात जयसूर्याला 'प्लेअर ऑफ द सिरीज' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जयसूर्याने दोन्ही डावात 8 विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. यासह श्रीलंकेचाही क्लीन स्वीप होण्यापासून बचाव झाला. हा सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी वाढ झाली असून त्यांनी WTC च्या गुणतालिकेत पुन्हा तिसरे स्थान पटकावले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news