नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी शिक्कामोर्तब केले. न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांच्या निवृत्तीनंतर ते 9 नोव्हेंबर रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेले न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, त्यांच्या वडिलांचा सरन्यायाधीश म्हणून प्रदीर्घ कार्यकाळ जवळून पाहताना त्यांना सरन्यायाधीश म्हणून काम करताना नक्कीच मार्गदर्शन होईल. त्याच्या वडिलांचा काळ आणि सध्याच्या काळात काय फरक आहे? यावर बोलताना त्यांनी, फरक फक्त आधुनिक जीवनाच्या आणि समाजाच्या गुंतागुंतीच्या संदर्भात असल्याचे म्हटले आहे. कायद्याच्या अंमलबजावणीत समतोल साधण्याचा प्रयत्न असेल. समाज अधिक गुंतागुंतीचा झाला आहे, असे न्यायमूर्ती चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले की "सर्व बदल होऊनही काही मूलभूत मूल्ये आहेत जी शाश्वत राहतात. बंधुत्व, प्रतिष्ठा, स्वातंत्र्य आणि समानता ही मुळात घटनात्मक मूल्ये आहेत. १९५० किंवा २१ व्या शतकातील तिसरे दशक असो, आपला समाज आणि राष्ट्र मजबूत करण्यासाठी आपण त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.".
न्यायपालिका ही याचिकाकर्त्यांसाठी न्याय मिळण्याचे चांगले ठिकाण बनेल यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. "देशाच्या न्यायव्यवस्थेचे नेतृत्व करणे हा एक मोठा सन्मान आणि मोठी जबाबदारी आहे." असे चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
सरन्यायाधीशांवर असलेल्या मोठ्या जबाबदारीबद्दल बोलताना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, "मला समाजातील गुंतागुंतीची सखोल माहिती आहे. प्रत्येक घटनात्मक न्यायालयाच्या न्यायमूर्तीला कर्तव्य बजावताना समतोल साधावा लागतो. समाजात स्थिरता, एकजुटता आणि शांतता आणणे हे न्यायमूर्तींच्या कार्याचे स्वरूप आहे."
देशाचे सध्याचे सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांनी २६ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली होती. त्यांचा कार्यकाळ केवळ ७४ दिवसांचा असून ते ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यापूर्वी त्यांना केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्र पाठवून उत्तराधिकार्याचे नाव पाठवण्याबाबत कळवले होते. लळीत यांनी त्यानुसार न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर सोमवारी राष्ट्रपतींनी चंद्रचूड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
यू. यू. लळीत यांनी सरन्यायाधीश पदाच्या अल्पशा काळात पाच हजार प्रकरणे निकाली काढली. जुने खटले तत्काळ मार्गी लागावेत म्हणून त्यांनी लिस्टिंग सिस्टीमही सुरू केली आहे.
हे ही वाचा :