नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : एक्साईज धोरणात बदल करुन मोठा घोटाळा केल्याचा आरोप झालेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सीबीआयच्या छापासत्रानंतर प्रतिक्रिया दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मला अटक होऊ शकते, असे सिसोदिया यांनी सांगत स्वतःच्या अटकेची शक्यता व्यक्त केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे केंद्र सरकार त्रस्त झाले आहे. त्यातूनच आपणास अटक करण्याचा कट रचण्यात आला आहे, असे सिसोदिया यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दिल्लीमध्ये आम्ही शिक्षणाचे चांगले मॉडेल तयार केले. याचा केंद्र सरकारला त्रास होत आहे, असे सांगून सिसोदिया पुढे म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना त्रस्त करण्यासाठी पुढील दोन-तीन दिवसांत आपणास सीबीआय अटक करु शकते. याआधी सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आलेली आहे. सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी माझ्या घरावर धाड टाकली. माझ्या दिल्ली सचिवालयातील कार्यालयातही छापे पडले. सीबीआयचे लोक चांगले होते. त्यांनी माझ्या कुटुंबासोबत चांगला व्यवहार केला. वरुन आदेश असल्यामुळे त्यांना सदरची कारवाई करावी लागली. ज्या अबकारी कर धोरणावरुन ही कारवाई केली जात आहे, त्यात घोटाळा म्हणण्यासारखे काहीच नाही. हे एक धोरण असून उलट ते चांगले धोरण आहे.
उपराज्यपालांनी एक्साईज धोरणात बदल केला नसता तर दिल्ली सरकारला दहा हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला असता, असे सांगत सिसोदिया पुढे म्हणाले की, भाजपचे नेते हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगत आहेत तर उपराज्यपाल १४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगत आहेत. काल जेव्हा सीबीआयवाले आले आणि त्यांनी गुन्हा दाखल केला तेव्हा एक कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे एफआयआरमध्ये लिहिले. वास्तविक आरोप करणाऱ्या लोकांना काहीच माहिती नसून ते उठसूठ आरोप करण्याचे काम करीत आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्सने शुक्रवारी दिल्लीतील शिक्षण मॉडेलचे कौतुक करणारी बातमी छापली होती. आम्हा सर्वांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. दुसरीकडे कोरोना संकटकाळात भारतात देशात कशा पद्धतीने अंतिम संस्कार केले जात होते, याच्या बातम्याही लोकांनी न्यूयॉर्क टाईम्समध्ये पाहिलेल्या आहेत.