वांबोरी : पुढारी वृत्तसेवा
राहुरी तालुक्याच्या सीमेवरील गुंजाळे परिसरात एका मानवी कवटीसह हाडे आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घातपात करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने गोणीत भरून येथे आणली की जादूटोणासाठी, याबाबत नागरिकांमधून अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
गुंजाळे घाट परिसरातून जाणार्या काही नागरिकांना मंगळवारी (दि.24) सकाळी दहाच्या सुमारास घाटातील पाण्याच्या टाकीच्या डोंगराळ भागात रस्त्याच्या कडेला दगडामध्ये एका गोणीत मानवी हाडे, त्यात डोक्याची कवटी, स्क्रू लावलेले मांडीचे हाड, तसेच इतरही मानवी हाडे आढळून आली. त्यांनी वांबोरी पोलिस दूरक्षेत्रात संपर्क करून याची कल्पना दिली. त्यानंतर राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, वांबोरी पोलिस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत बराठे, पोलिस कॉन्स्टेबल सुशांत दिवटे, आदिनाथ पाखरे यांच्यासह पोलिस फौजफाटा गुंजाळे घाटात दाखल झाला. परिसराचा पंचनामा करून आणखी काही धागेदोरे हाती लागतात का? याबाबत कसून तपासणी त्यांनी केली.
या घटनेबाबत गुंजाळेचे पोलिस पाटील सुनिता संदीप सँडल यांनी अज्ञात व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूची खबर दिली आहे. हाडांचा पंचनामा करून ते ताब्यात घेऊन वांबोरी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी ही हाडे औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. या हाडांच्या सांगड्यापासून त्या व्यक्तीचा शोध लावणे, तसेच त्याची हत्या झाली असल्यास आरोपीला शोधून काढण्याचे मोठे आव्हान राहुरीचे पोलिसांसमोर असणार आहे.
राहुरीसह नेवासा व नगर तालुक्याची सीमा तसेच नगर-औरंगाबाद महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले गुंजाळे गाव कायमच गुन्हेगारी कृत्यांमुळे चर्चेत राहिले आहे. काही महिन्यांपूर्वीच येथे गावठी कट्टा हाताळताना एकाचा मृत्यू झाला होता. नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल परिसरात अवैध व्यावसायिकांचा सर्रास वावर दिसून येतो. हा परिसर निर्मनुष्य व डोंगरी घाटमय असल्याने रात्री वाटसरूंना लुटण्याचे प्रकार घडतात.