Pune Ganpati News : सातासमुद्रापार निघाले ‘बाप्पा’; परदेशातून पुण्यातील गणेशमूर्तींना मोठी मागणी

Pune Ganpati News : सातासमुद्रापार निघाले ‘बाप्पा’; परदेशातून पुण्यातील गणेशमूर्तींना मोठी मागणी
Published on
Updated on
पुणे; पुढारी वृत्तसेवा : ऑस्ट्रेलियात राहणार्‍या आपल्या नातेवाइकांसाठी अमृताने कुरिअरद्वारे गणेशमूर्ती पाठविली अन् आता अमृताप्रमाणे अनेक जण परदेशात राहणार्‍या आपल्या नातेवाइकांसाठी गणेशमूर्ती उत्साहाने पाठवत आहेत. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरल्यामुळे परदेशात राहणार्‍या मराठीभाषकांकडून पुण्यातून गणेशमूर्ती मागविल्या जात असून, पुण्यात राहणारे त्यांचे नातेवाईक विविध देशांमध्ये कुरिअरद्वारे मूर्ती पाठवत आहेत.
ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इग्लंड, नेदरलँड, कॅनडा, सिंगापूरसह दुबईमध्ये गणेशमूर्ती कुरिअरद्वारे पाठविण्यात येत आहेत. 13 इंचांपर्यंतच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती विविध देशांमध्ये पाठविल्या जात आहेत. व्यवसायानिमित्त आणि नोकरीनिमित्त विविध देशांमध्ये मराठीभाषक वास्तव्यास आहेत. ते तिथे राहूनच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात. त्यामुळेच पुण्यातून काही जण गणेशमूर्ती मागवतात.
यंदाही कुरिअरद्वारे गणेशमूर्ती मागविण्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, यंदा पुण्यातून परदेशात गणेशमूर्ती पाठविण्याचा ट्रेंड वाढला आहे. पीओपीसह काही प्रमाणात शाडूच्या मूर्तीही पाठविण्यात येत आहेत. कुरिअद्वारे मूर्ती पोचायला चार ते पाच दिवस लागत असून, विशेष पद्धतीचे बॉक्स पॅकिंग करून मूर्ती पाठविल्या जात आहेत. पुण्यातील विविध कुरिअर कंपन्यांकडे यासाठी विचारणा होत आहे आणि यासाठी कुरिअर कंपन्यांकडे बुकिंगही येत आहे.
येत्या काही दिवसांत मागणी आणखी वाढेल, असे कुरिअर कंपन्यांच्या अधिकार्‍यांनी सांगितले. एका कुरिअर कंपनीचे संचालक दीपक नाडकर्णी म्हणाले की, आम्ही अमेरिका, नेदरलँड, कॅनडा आणि युके येथे मूर्ती पाठविल्या आहेत. चार ते पाच दिवसांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये या मूर्ती पोहचत असून, पीओपीच्या मूर्ती मागविण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

व्हिडीओ पाहून मूर्तींना पसंती

आम्ही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. त्याद्वारे आम्ही परदेशात राहणार्‍या मराठीभाषकांना गणेशमूर्तींचे छायाचित्र आणि व्हिडीओ पाठवतो. ते पाहून त्यातून मराठीभाषक एका मूर्तीची निवड करतात आणि ती मूर्ती त्यांचे नातेवाईक कुरिअरद्वारे परदेशात पाठवितात. आतापर्यंत आम्ही ऑस्ट्रेलिया, दुबई, अमेरिकेत मूर्ती  पाठविल्या आहेत. आताही मूर्तींसाठी बुकिंग येत आहे, असे गणेशमूर्तीचे विक्रेते
सचिन डाखवे यांनी सांगितले.
सध्या परदेशातील मराठीभाषकांकडून गणेशमूर्ती कुरिअरद्वारे मागविण्यास सुरुवात झाली आहे. खासकरून ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सिंगापूर, इंग्लंड आदी देशांमध्ये आम्ही मूर्ती पाठवत आहोत. सुमारे 150 ते 200 मूर्ती आतापर्यंत विविध देशांमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. मूर्ती कुरिअरद्वारे पाठविण्यासाठी आम्ही त्याला विशेष पद्धतीचे पॅकिंग करतो. यामुळे या मूर्ती व्यवस्थितरीत्या विविध देशांमध्ये पोहचत आहेत.
– सचिन पाटील, कुरिअर कंपनीतील व्यवस्थापक
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news