आईची परीक्षा अन् बाबाची कसोटी, केंद्राबाहेर बाळाला झोका देणाऱ्या वडिलांचा फोटो व्हायरल

हिंगोली न्यूज
हिंगोली न्यूज
Published on
Updated on

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा- शैक्षणिक आयुष्यातील सर्वात महत्वाच्या असलेल्या बारावीच्या परीक्षेला कालपासून राज्यभरात सुरुवात झाली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी हिंगोलीत एक वेगळे चित्र बघायला मिळाले. जिल्ह्यातील एका केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका महिलेचा पती आपल्या दीड वर्षांच्या बाळाला केंद्राबाहेर सांभाळताना दिसला. आई परीक्षेला आणि वडील चिमुरड्याला परीक्षा केंद्राबाहेर साडीचा झोका बांधून त्यात झोपी घालत असल्याचे अनोखे चित्र इथे बघायला मिळाले.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील केंद्र बुद्रुक येथील अमृतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात परभणीतील नंदीनी साबळे या महिलेचे परीक्षा केंद्र होते. नंदीनीला दीड वर्षांचा मुलगा आहे. शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द मनात असलेली नंदीनी बाळासह आणि पतीसह परीक्षा केंद्रावर आली. परीक्षा सुरू होण्यापूर्वी तिने केंद्राबाहेरील झाडाला साडीचा झोका बाळासाठी बांधून दिला आणि परीक्षा द्यायला गेली. यानंतर तिचा पती परीक्षा पूर्ण होईपर्यंत झाडाला बांधलेल्या झोक्यात बाळाला टाकून त्याला झोका देत होता.

यावेळी तिथे उपस्थित काही लोकांनी याचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द असणाऱ्या या दाम्पत्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव व्हायला लागला. आईची बारावीची परीक्षा तर केंद्राबाहेर बाळाला सांभाळण्याची वडिलांची कसोटी असे अनोखे चित्र असल्याचे वर्णन अनेकांनी यानंतर केले.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात ३३ परीक्षा केंद्रावर १३,४४९ विद्यार्थ्यांपैकी १२,८५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ५९७ विद्यार्थी इंग्रजीच्या पेपरला गैरहजर राहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news