पुणे : माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणार्‍या फरारी आरोपीला बेड्या | पुढारी

पुणे : माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणार्‍या फरारी आरोपीला बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  माथाडीच्या नावाखाली फिनिक्स मॉल विमाननगर येथील चालकाकडून बेकायदेशिररित्या खंडणी उकळणा-या  व मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला विमानतळ पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. दिपक संपत गायकवाड (47, रा. भोसलेवाडी, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात यापूर्वी रविंद्र उर्फ रवि जयप्रकाश ससाणे (रा. चंदननगर) मंगल सातपुते (रा. लोहगाव) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड येथील व्यावसायिक जितेंद्र राहुल राम (रा. पुनावळे, चिंचवड) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात खंडणीची तक्रार दिली होती.

दि. 6 डिसेंबर रोजी फिनिक्स मॉल विमान येथील फर्स्ट क्राय या कंपनीच्या शोरूमचे इंटर रिन्युवेशनचे काम करत असताना त्या कामासाठी लागणा-या प्लायवूडचा भरलेला ट्रक फिनिक्स मॉल येथे आला होता. त्यावेळी रवि ससाणे आणि त्याचा साथीदार मंगल सातपुते या दोघांनी फिर्यादी यांच्या कामगारांना ट्रकमधील प्लायवूड खाली करू न देता त्यांची अडवणूक केली. आम्ही येथील स्थानिक आहोत असे सांगून तेथे काहीएक काम न करता फिर्यादी यांच्याकडे आठ लाख रूपयांची खंडणीची मागणी करून तडजोडी अंती साडेचार लाख मागितले होते.

त्यानंतर याप्रकरणात आरोपींना अटक होऊन त्यांच्यावर मोक्काची कारवाई झाली होती. दरम्यान गुन्ह्यातील फरार आरोपी दिपक गायकवाड याचा शोध घेण्याच्या सुचना सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव दिल्या होत्या. दरम्यान गायकवाड हा मुळा रोड येथे येणार असल्याची माहिती रविंद्र ढावरे, पोलिस हवालदार उमेश धेंडे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, गुन्हे निरीक्षक संगीता माळी, अमंलदार सचिन जाधव, सचिन कदम, रूपेश पिसाळ, गिरीष नाणेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button