Kolhapur News | पन्हाळ्यात जातीय सलोख्याचे अनोखे दर्शन! हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन दुरुस्त केल्या दर्ग्यातील तुरबती

Kolhapur News | पन्हाळ्यात जातीय सलोख्याचे अनोखे दर्शन! हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन दुरुस्त केल्या दर्ग्यातील तुरबती

पन्हाळा, पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा येथील पुसाटी बुरुजाकडे जाणाऱ्या मार्गावरील तानपीर दर्ग्याची व परिसरात असणाऱ्या अन्य तुरबतीची अज्ञात समाज कांटकाच्याकडून मोडतोड करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पन्हाळ्यात काही काळ वातावरण तंग राहिले. मात्र पन्हाळ्यात सामाजिक सलोखा असल्याने तातडीने हिंदू-मुस्लिम समाजातील सर्वानी एकत्र येऊन तासाभरात समाजकटकांकडून मोडतोड केलेल्या कबरी पुन्हा उभारल्या आहेत. (Kolhapur News)

याबाबत अधिक माहिती अशी की, गेले आठवडा भर सोशेल मीडियावर पन्हाळ्यात अचानक नव्या दर्ग्याच्या बांधकाम होत आहे असे चुकीचे संदेश व्हायरल करून शेकडो वर्षाची परंपरा असणाऱ्या दर्ग्याबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी या दर्ग्यात येऊन तानपीर बाबांची तुरबत तसेच परिसरातील अन्य तुरबतीची मोडतोड केली. ही बाब पहाटे पन्हाळा पोलीस आणि पुजाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला. सकाळपर्यंत ही बातमी गावात सर्वत्र पसरली मात्र सर्व हिंदू-मुस्लिम समाजातील भक्त गण एकत्र आले व त्यांनी तातडीने या तुरबतीची दुरुस्ती करत तासाभरात तुरबती पूर्वीप्रमाणे केल्या.

या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली आहे. पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रमेश शेंडगे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी सकाळपासूनच घटनास्थळी थांबून तुरबतीचे पूर्ण बांधकाम करून घेतले. दरम्यान या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी दिली तसेच या प्रकरणात सायबर गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे तसेच सर्वांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

पन्हाळ्यात सर्वत्र शांतता असून कोणत्याही प्रकारचा तणाव नाही. पन्हाळकर हिंदू मुस्लिम समाजातील एकीचे हे उत्तम उदाहरण असून आज पन्हाळ्यातील लोकांनी उत्स्फुर्तपणे व्यवहार बंद ठेवले. पन्हाळ्यात जातीय तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नाला पन्हाळकर कधीही जुमानत नाहीत याचा प्रत्यय आज पुन्हा दिसून आला. पन्हाळ्यातील जातीय सलोख्याचे संबंधाने येथील धार्मिक भावबंध पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले. सर्वानी एकत्र येत दाखवलेली समाजिक सलोख्याची परंपरा आजच्या समाज कटकांच्या जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूला चपराक आहे.

पन्हाळा पोलिसांनी वाघबीळ, बुधवार पेठ या ठिकाणी दिवसभर नाकाबंदी केली, गडावर जाण्यासाठी प्रवेश दिला जात नसल्याने काय घडले आहे अशी विचारणा होत होती. मात्र पन्हाळा नागरिकांनी याबाबत माहिती दिली नाही. पन्हाळा पोलिसात तुरबती मोडतोड प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून जयसिंगपूर व पन्हाळा येथील असे दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे व त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक रमेश ठाणेकर यांनी सांगितले.

सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणारे पन्हाळ्याबाबत अजून विविध पोस्ट टाकत असून याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्याकडे पन्हाळा नागरिकांनी मागणी केली आहे. त्यानुसार तातडीने हालचाली सुरू झाल्या असून सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले, तसेच आज झालेल्या मोडतोड प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज देखील तपासणी सुरू झाली आहे. पन्हाळ्यातील घटनेबाबत कोणीही चुकीचे मेसेज पाठवू नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. चुकीचे मेसेज करणा-यावर कडक करावाई करण्यात येईल असेही पोलिसांनी सांगितले. (Kolhapur News)

पन्हाळ्यातील सलोखा, बंधूभाव अखंड

दरम्यान, माजी शिवसेना आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली व या घटनेची माहिती घेतली. पन्हाळ्यात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला आहे त्याचा पन्हाळा नागरिकांच्या वतीने जाहीर निषेध करत असल्याचे पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील, असिफ मोकाशी, भाजप शहर प्रमुख अमरसिंह भोसले यांनी म्हटले आहे. पर्यटक म्हणून पन्हाळ्यात जरूर या पण पन्हाळ्याचे आरोग्य बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करू नये, पन्हाळ्यातील सामाजिक सलोखा व बंधूभाव कधीही अशा प्रकारच्या घटनांना खत पाणी घालणार नाही. येथील सलोखा, बंधूभाव अखंड आहे व राहणार आहे अशी प्रतिक्रिया अमरसिंह भोसले यांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात चुकीचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पन्हाळा नागरिकांनी एकत्र येत जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन प्रांत अधिकारी तहसीलदार यांना निवेदन दिले होते.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news