नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – दिल्लीतील जामिया नगर येथील हिंसाचार प्रकरणातला आरोपी शरजिल इमाम याच्यासह दहा अन्य आरोपींच्या सुटकेला पोलिसांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 2019 साली जामिया नगरमध्ये दंगल उसळली होती. शरजिल व आसिफ इक्बाल हे या प्रकरणातले मुख्य आरोपी होते. ( Jamia Violence 2019 )
शरजिलसह 11 आरोपींची कनिष्ठ न्यायालयाने अलिकडेच मुक्तता केली होती. त्याला दिल्ली पोलिसांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. साॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पोलिसांच्या वतीने मुख्य न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा तसेच न्यायमूर्ती सुब्रम्हण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली. सदर प्रकरणावर 13 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतली जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
नागरिकता कायद्याला विरोध करीत जामियानगरमध्ये मोठा हिंसाचार करण्यात आला होता. दंगल भडकविण्यामागे शरजिलचा हात होता, असा युकि्तवाद पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात केला होता. जामिया मिलिया विद्यापीठात त्याने 13 डिसेंबर 2019 रोजी प्रक्षोभक भाषण केले होते, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले होते. याशिवाय 2020 साली दिल्लीत झालेल्या भीषण जातीय दंगलीमागेही इमाम असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. शरजिल विरोधात परिसि्थतीजन्य पुरावे नसल्याचे सांगत कनिष्ठ न्यायालयाने अकरा जणांची मुक्तता केली होती. मात्र आता पोलिसांनी या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
हेही वाचा :