MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर ‘१४ मे’ ला सुनावणी

MLA disqualification case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर ‘१४ मे’ ला सुनावणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची संभाव्य तारीख पुन्हा बदलली आहे. आता या प्रकरणावर सुनावणी '१४ मे'ला होण्याची शक्यता आहे. यापूर्वी या सुनावणीची संभाव्य तारीख २६ एप्रिल होती.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात तर शिवसेना शिंदे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना शिंदे गटासह ठाकरे गटाच्याही आमदारांना पात्र ठेवले होते. मात्र ठाकरे गटापूर्वी शिंदे गटाने या संबंधीची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. दरम्यान, यापुर्वी ७ मार्चला ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घेतली होती. यावेळी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीतील मूळ कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने मागवली होती. त्यानंतर या याचिकेवर पुढील सुनावणीची संभाव्य तारीख २६ एप्रिलला दर्शवण्यात आली होती. मात्र आता ही संभाव्य तारीख बदलून १४ मे झाली आहे. या प्रकरणावर येता सुनावणीत ही याचिका सर्वोच्च न्यायालयात ठेवावी की उच्च न्यायालयात पाठवावी, याबद्दलचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाला १८ मे पासून ७ जुलै पर्यंत उन्हाळी सुट्ट्या आहेत. त्यामुळे १८ मे पूर्वी जर आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष आणि चिन्ह प्रकरणांवर सुनावणी होऊ शकली नाही, तर हे दोन्ही प्रकरण थेट ७ जुलै नंतर ऐकले जातील. दरम्यान, ४ जूनला देशात सरकार कोणाचे येईल, हे स्पष्ट झालेले असेल. त्यामुळे ही सुनावणी संभाव्य तारखेवर होणार का? आणि त्यातून काही निर्णायक बाजू समोर येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news