मुंबई, पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांच्या 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा'ने लोकसभा निवडणूक 2024 साठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. याला 'वचननामा' असे नाव देण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 25) पत्रकार परिषदेमध्ये हा वचननामा सादर करण्यात आला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपसोबत युती असतानाही आम्ही आमचा जाहीरनामा वेगळा प्रसिद्ध करायचो. सध्या महाविकास आघाडीत असताना आम्ही स्वतंत्रपणे आमचा वचननामा जाहीर करत आहे. सरकार कसे चालवायचे याबद्दल एसएनपी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांचे स्वतःचे विचार आहेत. हा जाहीरनामा म्हणजे आर्थिक विकासापासून ते पर्यावरण संरक्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने केलेल्या आश्वासनांचा एक व्यापक संच आहे.
ठाकरे पुढे म्हणाले, 'आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. हुकूमशाही संपवण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण राज्यावर केवळ एकाच व्यक्तीचा अधिकार असावा, असे होऊ नये. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. मी गुजरातच्या विरोधात नाही. मात्र महाराष्ट्राला लुटून गुजरातमध्ये पाठवले जात आहे. हे थांबवले पाहिजे. आम्ही गुजरातचे काही ओरबाडून घेणार नाही. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रत्येक राज्याचा मान ठेऊ, सर्व राज्यांचा आदर ठेऊ मात्र आर्थिक केंद्र नव्याने महाराष्ट्रात उभारू, ज्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होईल,' असे स्पष्ट केले.