दहशतवादी हाफीज सईदवरुन पाकचे रडगाणे सुरुच, म्‍हणे “भारताबरोबर…,

लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्‍हाेरक्‍या हाफिज सईद.
लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्‍हाेरक्‍या हाफिज सईद.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मुंबईसह संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्‍हाेरक्‍या हाफिज सईद (Hafiz Saeed) याच्या प्रत्यार्पणावरुन पाकिस्‍तानने आपले रडगाणे सुरुच ठेवले आहे. भारताच्‍या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान सरकारला सईदच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची औपचारिक विनंती पाठवली होती. यानंतर पाकिस्‍तानने आपले नकाराचे नेहमीचेच पालूपद कायम ठेवले आहे. (Hafeez Saeed Extradition Demand )

Hafeez Saeed : भारताबरोबर द्विपक्षीय प्रत्यार्पण करार नाही

पाकिस्‍तानने हाफिज सदईला ताब्‍यात देण्‍याची मागणी केल्‍याचे पुष्‍टी केली, परंतु भारताबरोबर आमचा कोणताही द्विपक्षीय प्रत्यार्पण करार नाही, असे म्‍हटत अप्रत्‍यक्षपणे दहशतवादी हाफीज सईद यांचे समर्थनच केले आहे. माध्‍यमांशी बोलताना पाकिस्‍तान परराष्‍ट्र कार्यालयाच्‍या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी सांगितले की, "सईदचे प्रत्यार्पण करण्याची मागणी भारतीय अधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र हे लक्षात घेणे महत्त्‍वाचे आहे की, पाकिस्तान आणि भारतामध्ये कोणताही द्विपक्षीय प्रत्यार्पण करार अस्तित्वात नाही. नवी दिल्लीचा इस्लामाबादसोबत प्रत्यार्पण करार नाही. (Hafeez Saeed Extradition Demand )

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफीज सइईद

मुंबईत २००८ मध्ये झालेल्या हल्ल्याचा प्रमुख आरोपी असलेला दहशतवादी हाफिज सईद हा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीमध्ये अग्रस्थानावर असून अमेरिकेनेही त्याच्यावर एक कोटी डॉलर्सचे इनाम जाहीर केले आहे. जमात-उद-दावा संस्थापक हाफिज सईदला १० डिसेंबर २००८ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. तसेच अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटद्वारे जागतिक दहशतवादी म्हणून हाफीज सईदच्या नावाची घोषणा केली होती. दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत रोखणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतर जुलै २०१९ मध्ये पाकिस्तान सरकारने हाफीज सईदला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सध्या हाफीज सईद हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना जमात उद दावाच्या अन्य दहशतवाद्यासमवेत तुरुंगात आहे.

सईदचा मुलगा पाकिस्‍तानच्‍या राजकारणात

गेल्या वर्षी भारताने सईदचा मुलगा तलहा सईद याला बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (युएपीए) अंतर्गत दहशतवादी घोषित केले होते. तलहा सईद आता पाकिस्तानातील आगामी सार्वत्रिक निवडणुका पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग च्या बॅनरखाली लढण्याची तयारी करत आहे. या पक्षाचा संस्थापक देखील हाफीज सईद आहे. लाल किल्ल्यावरील दहशतवादी हल्ला, २००० मध्ये रामपूर (उत्तर प्रदेश) येथील सीआरपीएफ शिबिरावरील दहशतवादी हल्ला, २००८ मध्ये मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ला, तसेच २०१५ मध्ये उधमपूर (जम्मू-काश्मीर) येथे बीएसएफच्या ताफ्यावर झालेला दहशतवादी हल्ला या हल्ल्यांमध्ये हाफीज सईद प्रमुख आरोपी आहे.


हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news