‘तोयबा’चा म्होरक्या कैसर फारुकचा कराचीत खात्मा | पुढारी

‘तोयबा’चा म्होरक्या कैसर फारुकचा कराचीत खात्मा

कराची, वृत्तसंस्था : 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचा जहाल दहशतवादी कमांडर हाफीज सईदचा उजवा हात समजला जाणारा मुफ्ती कैसर फारुक याची कराचीत दोन अज्ञात हल्लेखोरांनी मशिदीबाहेर दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केली. या हत्येचा व्हिडीओही समोर आला आहे. दुसरीकडे हाफीज सईदचा मुलगाही काही दिवसांपासून बेपत्ता असून त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्याच्या मृत्यूचीही जोरदार चर्चा सुरू आहे.

भारतात घातपाती कारवाया करणार्‍या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेबाबत सध्या पाकिस्तानात खळबळजनक घटना घडत आहेत. शनिवारी लष्करचा सहसंस्थापक म्हणून ओळखला जाणारा आणि हाफीज सईदचा उजवा हात असलेल्या मुफ्ती कैसर फारुक याची हत्या करण्यात आली. 30 वर्षीय फारुक शनिवारी कराचीच्या समनाबाद भागात मशिदीतून बाहेर पडल्यानंतर दोन बंदूकधारी पुढे सरसावले व त्यांनी त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. त्याच्या शरीरात अनेक गोळ्या घुसल्या. रक्तबंबाळ फारुक जागीच ठार झाल्याचे वृत्त द डॉन या वृत्तपत्राने दिले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात मुफ्ती कैसर फारुक याच्यावर झालेल्या हल्ल्याचे स्पष्ट चित्रण दिसत आहे.

‘तोयबा’ला जबर हादरा

भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी हाफीज सईदने लष्कर-ए-तोयबा ही जहाल दहशतवादी संघटना स्थापन केली. त्यात मुफ्ती कैसर फारुक सहसंस्थापक होता. पाकिस्तानच्या विविध भागांतून तरुणांना आणून संघटनेत दहशतवादी म्हणून भरती करण्याचे व त्यांना भारतविरोधी कारवायांसाठी तयार करण्याचे काम त्याच्याकडे सोपवण्यात आले होते. त्याच्या हत्येमुळे लष्कर-ए-तोयबाला जबर हादरा बसल्याचे मानले जात आहे.

26/11 च्या मास्टर माईंडच्या मुलाचे अपहरण; मृत्यूबाबत तर्कवितर्कांना उधाण

लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद हा 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्याचा मुलगा कमालुद्दीन सईद याचे तीन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आल्याची माहिती असून त्याचा आजतागायत थांगपत्ता लागलेला नाही. मात्र त्याची हत्या करण्यात आल्याच्या बातम्या सोशल मीडियात व्हायरल होत असून त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण तो बेपत्ता आहे हे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. कमाल सईद याचे तीन दिवसांपूर्वी एका एसयूव्हीतून आलेल्या चारजणांनी अपहरण केले.

त्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्याच्या अपहरणाच्या बातमीनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली असून सोशल मीडियावर त्याच्या हत्येच्याही बातम्या व्हायरल होत आहेत. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लष्कर-ए-तोयबामधील संघर्षातून अपहरण झाल्याची एक शक्यता वर्तवण्यात येत आहे तर दुसर्‍या एका शक्यतेनुसार कमाल सईदवर हल्ल्याची शक्यता ध्यानात घेऊन आयएसआयएनेच त्याला सुरक्षितस्थळी दडवले असावे, असे सांगण्यात येत आहे.

Back to top button