पुढारी ऑनलाईन : जगभरात अनेक लोक आहेत, जे असामान्य कृती करून आपली एक वेगळी ओळख निर्माण करतात. ब्रिटनमधील जेमी मॅकडोनाल्ड नावाच्या एका व्यक्तीने अवघ्या आठवड्याभरात जगातील ७ आश्चर्यांना भेट दिली. त्याच्या या कृतीसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित (Guinness World Record) करण्यात आले आहे.
'अॅडव्हेंचरमॅन' जेमी मॅकडोनाल्डने सात दिवसांत जगातील सर्व आश्चर्यांना भेट देण्याचे आव्हान स्वीकारले आणि ते यशस्वीपणे पूर्ण देखील केले. त्याने चीनची ग्रेट वॉल, ताजमहाल, पेट्रा, कोलोझियम, क्राइस्ट द रिडीमर, माचू पिचू आणि चिचेनिझ्झा इत्झा जगभरातील या सात ठिकाणांना अवघ्या ६ दिवस, १६ तास आणि १४ मिनिटांत भेट (Guinness World Record) दिली.
मॅकडोनाल्डने त्याच्या संपूर्ण प्रवासादरम्यान १३ वेळा विमान उड्डाण, १६ वेळा टॅक्सी, ९ बस, ४ ट्रेन आणि एक टोबोगन घेतले होते. त्याने चार खंडांमध्ये एकूण ३६,७८० किमी अंतर कापले असल्याचे त्यानी आपल्या ट्विटरवरून केलेल्या पोस्टमधून सांगितले आहे. मॅकडोनाल्डची जगभरातील ही सहल केवळ एक विक्रम प्रस्थापित करण्यासाठी केलेली कृती नव्हती, तर या ट्रिपचा उद्देश सुपरहिरो फाउंडेशन नावाच्या धर्मादाय संस्थेसाठी पैसे उभारणे (Guinness World Record) हा होता.
नऊ वर्षांपासून सिरिंगोमिलिया नावाच्या दुर्मिळ मणक्याच्या आजाराने ग्रस्त असताना, मॅकडोनाल्डला त्याच्या आरोग्याच्या संकटात त्याला साथ देणाऱ्या रुग्णालयांच्या संस्थेसाठी काहीतरी विशेष करायचे होते. म्हणून 2012 मध्ये, मॅकडोनाल्डने प्रखर आव्हाने स्वीकारून रुग्णालयांसाठी निधी उभारण्यास सुरुवात केली. हा प्रवास देखील याच उपक्रमाचा भाग असल्याचे मॅकडोनाल्डने म्हटले आहे.