कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये मुस्लीम मावळ्यांकडून शिवरायांना अभिवादन; मशिदीत मुर्तीची प्रतिष्ठापना

कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये मुस्लीम मावळ्यांकडून शिवरायांना अभिवादन; मशिदीत मुर्तीची प्रतिष्ठापना

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : राज्यात अजानच्या भोंग्यावरुन सध्या धार्मिक वातावरण तापलेले असताना, कुरुंदवाड शहरातील युवकांनी एकत्रित येत मशिदीत शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन केले.

दुपारच्या नमाजनंतर शहरातील सर्व मंडळांना भेटी देत, शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्साहात शिवजयंती साजरी केली. ढेपणपूर आणि शेळके मशीद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापन करण्यात आली. या उपक्रमामुळे शहरात धार्मिक सलोखा कायम ठेवणारं समाधानकारक चित्र पाहायला मिळाले.

परंपरेनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सप्ताह सुरू असून, विविध सामाजिक उपक्रमाने जयंती साजरी होत आहे. कुरुंदवाड शहरातही शिवजयंती अत्यंत उत्साही वातावरणात सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते अबू घोरी, तनवीर मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी नमाज-पठण झाले. नंतर शहरातील मुस्लिम युवकांनी एकत्रित येऊन शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज की जय…,जय…भवानी जय…शिवाजी अशा घोषणा देत, ठिकाणी भेटी दिल्या. यानंतर मुस्लिम मावळ्यांतर्फे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

मुस्लिम मावळ्यांनी संपूर्ण शहर शिवमय केल्याच्या भावना नागरिकातून व्यक्त होत आहेत. गणेशोत्सवासारखी ढेपणपूर आणि शेळके मशिदीत शिवरायांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्याला एकतेचा आणि सलोख्याचा संदेश दिला आहे. यावर्षी कोरोनानंतर निर्बंध मुक्त कार्यक्रमांमुळे संपूर्ण सप्ताह मिरवणूक आणि विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होणार आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news