Goa Election : पत्नीप्रेमापोटी कवळेकर साम्राज्याचा अस्त

Goa Election : पत्नीप्रेमापोटी कवळेकर साम्राज्याचा अस्त

मडगाव : विशाल नाईक

भाजपचे उमेदवार सुभाष फळदेसाई यांच्या सांगे मतदारसंघातील हस्तक्षेप कवळेकर दाम्पत्याला घरी बसविण्यास कारणीभूत ठरला आहे. सुभाष फळदेसाई यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या सावित्री कवळेकर यांनी सांगेच्या भाजप मंडळात फूट पाडून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांच्या बंडखोरीला बाबू कवळेकर यांचे समर्थनही होते. सावित्री कवळेकर यांच्यामुळे तब्बल वीस वर्षांनंतर केपे मतदारसंघावरील कवळेकर साम्राज्याचा अस्त झाला आहे. सावित्री कवळेकर यांचाही सांगेत पराभव झाला आहे. कवळेकर दाम्पत्याचा पराभवासोबतच घराणेशाहीचा फटका आलेमाव कुटुंबालाही बसला आहे. बाणावलीत चर्चिल आलेमाव आणि नावेलीत त्यांची कन्या वालंका आलेमाव यांनाही मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे.

गेली 20 वर्षे बाबू कवळेकर केपेचे नेतृत्व करत आहेत. तीन वर्षांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या पाठोपाठ 2017 च्या विधानसभेच्या सांगेतील काँग्रेसच्या पराभूत उमेदवार आणि त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनीही भाजपात प्रवेश केला होता. त्यांनी भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. मात्र, पक्षाने सुभाष यांना उमेदवारी दिल्यानंतर सावित्री यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. सावित्री यांची बंडखोरी शमविण्यासाठी बाबू यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. याउलट बाबू यांनी सावित्री यांना मदत केली. बाबू यांच्या या कृतीची माहिती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचली होती. पक्षानेही सावित्री यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यामुळे बाबू यांनी सांगेतील लुडबुड सुरूच ठेवली. त्यातच नुकतेच बाबू यांनी आपण मुख्यमंत्री पदासाठी योग्य असल्याचे विधान करून थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी वैरत्व घेतले होते. बाबू आणि त्यांची पत्नी सावित्री यांच्या पराभवाला वरील कृत्ये कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

केपेत बाबू कवळेकर यांच्या विरोधात ख्रिस्ती समाज एकटवला होता. आंबावली, इग्रामळ आदी भागात ख्रिश्चन उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केल्याने केपे शहर आणि आंबावली परिसर त्यांच्या विरोधात गेल्याचे बोलले जात आहे. एक कार्यकाळ जिल्हा पंचायत सदस्य आणि चार कार्यकाळ केपेचे आमदार अशी सुमारे 25 वर्षे सत्ता गाजवलेले बाबू कवळेकर यांना सावित्री कवळेकर यांच्या सांगेतील हस्तक्षेपामुळे अपयशाला सामोरे जावे लागले आहे. एल्टन डिकॉस्ता यांच्याकडून ते 3443 मतांनी पराभूत झाले आहे. सांगेत सावित्री कवळेकर सुभाष फळदेसाई यांच्याकडून 1429 मतांनी पराभूत झाल्या आहेत.

बाणावली मतदारसंघात आम आदमी पक्षाचे उमेदवार वेंन्झी व्हिएगस यांनी सासष्टीतील बलाढ्य नेते चर्चिल आलेमाव यांचा पराभव केल्याने तेही जायंट किलर ठरले आहेत. चर्चिल यांनी तृणमूल पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. त्यांनी कन्या वालंका आलेमाव यांनाही नावेलीतून तृणमूलच्या उमेदवारीवर उतरवले होते. या दोघांचाही पराभव झाला आहे. आपली ही शेवटची निवडणूक असेल असे चर्चिल यांनी स्पष्ट केले होते.नावेलीत वालंका आलेमाव यांना भाजपचे उल्हास तुयेकर यांनी पराभूत केले आहे. वालंका निवडून याव्यात यासाठी तत्कालीन आमदार आणि तृणमूलचे खासदार लुईझिन फालेरो यांनी हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला होता. या धक्कादायक निर्णयामुळे आलेमाव कुटुंबीयांनाच नव्हे, तर लुईझिन फालेरो यांना जबरदस्त धक्का बसला आहे. 2012 च्या निवडणुकीत आलेमाव कुटुंबाला घराणेशाहीचा फटका बसलेला आहे. चर्चिल आलेमाव आपच्या व्हेंजी व्हिएगस यांच्याकडून 1271 मतांनी, तर वालंका या भाजपचे उमेदवाराकडून केवळ 430 मतांनी पराभूत झाल्या आहेत.

लोकांनीच दाखविली बाबूंना जागा : एल्टन

2017 मध्ये निवडून आल्यावर त्यांनी काँग्रेसच्या नऊ आमदारांबरोबर भाजपात प्रवेश केला होता. त्यांना भाजपचे उपमुख्यमंत्री पदही लाभले होते. मात्र, एल्टन डिकॉस्ता यांच्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. या पराभवाचे पडसाद केपेतील राजकारणावर पडणार असून केपे पालिकावरील कवळेकरांची सत्ताही संपुष्टात आल्याचे जमा आहे. बाबू कवळेकरांच्या पराभवासाठी ते खुद्द जबाबदार असल्याची प्रतिक्रिया एल्टन यांनी दिली आहे. बाबू यांना लोकांनीच त्यांची जागा दाखवून दिली आहे, असे एल्टन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कवळेकरांच्या बालेकिल्ल्याला भगदाड

केपेत गेली चार वेळा निवडून येणार्‍या बाबू कवळेकर यांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून काँग्रेसचे एल्टन डिकॉस्ता हे जायंट किलर बनले आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढविलेल्या एल्टन यांनी कवळेकर यांचा पराभव केला आहे. एल्टन डिकॉस्ता यांना 14 हजार 998 मते, तर बाबू कवळेकर यांना 11397 मते मिळली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news