पुढारी ऑनलाईन: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या आवाहनानंतर देशातील १५ भाजपविरोधी पक्षाची बैठक आज (दि.२३ जून) पाटणा येथे होत आहे. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांसह, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सहा राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला हे सर्व विरोधी पक्षनेते आज सकाळी ११.३० च्या सुमारास उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विरोधी पक्षांकडून लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपविरोधात रणनीती आखणार आहेत. भाजपला सामोरे जाण्यासाठी संयुक्त विरोधी आघाडी तयार करण्यासाठी एकमत होण्यासाठी या महाबैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पाटण्यामध्ये आज भाजपविरोधात देशातील प्रमुख पक्षातील विरोधक एकत्र येत आहेत. या बैठकीला देशभरातील प्रमुख पक्षांचे महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत. मुख्यविरोधी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, मेहबूबा मुफ्ती, हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल आदी उपस्थित राहणार आहेत.