कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : गणेश चतुर्थीनंतर तिसर्या दिवशी ज्येष्ठा गौरीचे आगमन होणार आहे. गौराईच्या आवडीची चवळी, शेपू-भोपळ्याची भाजी, वडी-भाकरीसाठी लागणार्या साहित्याच्या खरेदीला बुधवारी बाजारात गर्दी झाली होती. गौराई व शंकरोबाचे तयार मुखवटे, रेडिमेड गौराई खरेदीकडेही यंदा कल दिसून येत आहे. (Gauri Ganpati)
ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या निमित्ताने नदी, तलाव, विहिरींवरून पाणी आणले जाते. पंचगंगा नदी घाटावरून गौराईचे पूजन करून वाजत-गाजत घरी आणण्यात येते. जिल्ह्यातील नदीघाट, तलाव, विहिरींवरही गर्दी होते. बेंजो, हलगीसह पारंपरिक वाद्यांचेही बुकिंग यानिमित्ताने सुरू आहे. बुधवारी पापाची तिकटी, गंगावेश, कुंभार गल्ली, महाद्वार रोडवर गौरीचे मुखवटे, दागिने, गौराईची तेरडा वनस्पती, शंकरोबा खरेदीसाठी महिला दाखल झाल्या होत्या.
गौरीची वनस्पती अर्थात तेरडा ही एक औषधी वनस्पती आहे. महागाईमुळे या वनस्पतीचे दरही वधारले आहेत. यामुळे आपण मातीकडून जे घेतो ते मातीला द्यावे, या उक्तीप्रमाणे भक्तांनी घरीच तेरडा वनस्पतीचे रोपण करणे, निर्माल्याचा खत म्हणून वापर करण्याकडे वळणे गरजेचे आहे. गौरीची वनस्पती (तेरडा) व शंकरोबा या दोन्ही तणवर्गीय वनस्पती असून त्यांचे औषधी उपयोग असल्याने भविष्यात याच्या रोपणावर भर देणार असल्याचे निसर्गमित्र संस्थेचे अनिल चौगुले यांनी सांगितले.
हेही वाचा