Gangs of Prayagraj | धक्कादायक! तांडव, जग्वार, टायगर, रंगबाज…प्रतिष्ठित शाळांतील मुलांनी बनवले गँग्ज अन् घडवून आणले ६ बॉम्बस्फोट

Gangs of Prayagraj | धक्कादायक! तांडव, जग्वार, टायगर, रंगबाज…प्रतिष्ठित शाळांतील मुलांनी बनवले गँग्ज अन् घडवून आणले ६ बॉम्बस्फोट
Published on
Updated on

प्रयागराज; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये शाळकरी मुलांचा गँग्ज (Gangs of Prayagraj) पकडण्यात आला आहे. हा गँगमध्ये हायस्कूल आणि इंटरमीडिएट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गँग्जचा गेल्या तीन महिन्यांत विविध शाळांबाहेर झालेल्या किमान सहा बॉम्बफेकीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ११ मुलांना अटक केली असून त्यातील १० जण अल्पवयीन आहेत. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. ही सर्व मुले प्रतिष्ठित शाळांत शिकणारी आहेत.

तांडव, जग्वार, टायगर, इमॉर्टल, रंगबाज….अशी या शाळकरी मुलांच्या गँग्जची आणि व्हॉटस्‌ ॲप ग्रुपची नावे आहेत. वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी किंवा गँगवॉर जिंकण्यासाठी या गँग्जमधील मुले शाळांबाहेर बॉम्ब फेकत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बॉम्ब फेकण्याची शेवटची घटना २२ जुलै रोजी घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमधील प्रतिष्ठित शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांनी व्हॉट्स ॲपवर आपआपले गँग (Gangs of Prayagraj) बनवले आहेत. त्यांनी ऑनलाइन व्हिडिओ आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बॉम्ब बनवण्याची पद्धत शिकली. त्यांनी त्यांच्या गटाचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी तीन प्रमुख कॉन्व्हेंट शाळांच्या गेटबाहेर क्रूड बॉम्ब फेकले आणि सोशल मीडियावर या कृत्याचे व्हिडिओ अपलोड केले.

तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ११ विद्यार्थ्यांना अटक केली आहे. त्यातील १० मुले अल्पवयीन आहेत. त्यांच्यावर आयपीसी आणि स्फोटक घटक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली, १० मोबाईल फोन आणि दोन क्रूड बॉम्बही जप्त करण्यात आले आहेत. एकाची रवानगी तुरुंगात, तर उर्वरित १० अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

फटाक्यापासून तयार केले बॉम्ब

प्रयागराज विभागाचे पोलिस महानिरीक्षक राकेश सिंह यांनी सांगितले की "लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्सवर गट तयार केल्यानंतर शहरातील तीन वेगवेगळ्या कॉन्व्हेंट शाळांमधील हे विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी प्रतिस्पर्धी शाळेच्या गेटवर ते बॉम्ब फेकण्याची कृती करत होते. क्रूड बॉम्ब बनवण्यासाठी ते फटाके खरेदी करायचे. त्यातील स्फोटक पदार्थ बाहेर काढायचे आणि त्यात ग्लास, विटांचे तुकडे इत्यादी मिसळून क्रूड बॉम्ब बनवायचे. "ज्या मुलांना अटक करण्यात आली आहे ते शालेय शिक्षणात कमकुवत आहेत. त्यांना परीक्षेत ४५ टक्के ते ५५ टक्के गुण मिळाले आहेत," असे राकेश सिंह यांनी म्हटले आहे. त्यांचे समुपदेशन केले जात असल्याचे ते म्हणाले.

घरातून 'हे' कारण सांगून घेत होते पैसे

ही मुले १४ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत. त्यांचे किमान असे १० गट आहेत ज्यात २ हजारपेक्षा विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. पहिली बॉम्बस्फोटाची घटना २२ मे २०२२ रोजी सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. यावेळी दोन प्रतिस्पर्धी गटांच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती आणि क्रूड बॉम्ब फेकले गेले होते. नंतर ४, १५, १६, २२ आणि २५ जुलै रोजी इतर शाळांबाहेर अशाच घटना घडल्या होत्या. हे विद्यार्थी त्यांच्या पालकांकडून शैक्षणिक सहल आणि अभ्यासक्रम उपक्रमांचे कारण सांगून पैसे घेत होते. हे पैसे ते बॉम्ब तयार करण्यासाठी आणि चैनीसाठी वापरत होते, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news