गडचिरोली : नक्षल्‍यांचा घातपाताचा कट फसला; स्फोटकांनी भरलेली ६ प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स, माईन्स पोलिसांकडून नष्‍ट

नक्षल्‍यांचा घातपाताचा कट फसला
नक्षल्‍यांचा घातपाताचा कट फसला

गडचिरोली ; पुढारी वृत्‍तसेवा लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी आज (सोमवार) सकाळी हुडकून काढली. यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट फसला.

पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक झाली. या निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड परिसरात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु त्यावेळी ही स्फोटके पोलिसांना सापडली नाहीत. शिवाय मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे नक्षल्यांनाही घातपात करता आला नाही. परंतु काल स्फोटके असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर सी-६० पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाचे जलद प्रतिसाद पथक तसेच बॉम्ब शोधक व नाशक विभागाचे दोन पथक टिपागड परिसरात पाठविण्यात आले. या पथकातील जवानांनी पहाडावर दडवून ठेवलेली स्फोटके, क्लेमोर माईन्स आणि प्रेशर कुकर्स हुडकून काढण्यात आले.

पोलिसांना घटनास्थळी स्फोटकांनी भरलेली ६ प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स, स्फोटके असलेली ३ क्लेमोर माईन्स आणि ३ रिकामी क्लेमोर माईन्स आढळून आली. शिवाय गन पावडर, ब्लँकेट आणि औषधेही तेथे सापडली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलिसांनी ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स नष्ट केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. पोलिस जवळच्या पोलिस ठाण्यात सुखरुप पोहचल्यानंतर तेथे नक्षल्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news