राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंना 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी, 44 जणांची 4 कोटी 85 लाखांची फसवणूक

shailaja darade
shailaja darade

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिक्षक, आरटीओ तसेच नोकरी लावण्याच्या अमिषाने 44 जणांकडून तब्बल 4 कोटी 85 लाख उकळल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण, सुसरोड) यांना पुणे लष्कर न्यायालयाने 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान यापुर्वी याप्रकरात त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) याला 4 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. या दोघांवर हडपसर पोलिस ठाण्यात संगणमत करून फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोपट सुखदेव सुर्यवंशी (50, रा. मु. पो. खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक या पदावर नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी 12 लाख व 15 लाख असे 27 लाख रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांना आजपर्यंत शिक्षक पदावर नोकरी लावली नाही. तसेच त्यांनी वारंवार मागणी करुन त्यांचे पैसे परत केले नाही. अशाच प्रकारे 44 जणांचा विश्वास संपादन करुन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याबाबत पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला होता. चौकशीअंती दराडे यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांना सोमवारी दुपारी पुणे येथील लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील अंजला नवगिरे यांनी दराडे यांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. दाखल गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. 2019 मध्ये दराडे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहत असताना त्यांनी पदाचा गैरवापर करत नोकरीस लवण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधींचा अपहार केल्याचे नवगिरे यांनी युक्तीवादादरम्यान सांगितले. तसेच हुशार विद्यार्थ्यांना डावलून त्यांनी पैसे घेतले आहेत, ज्यांची पात्रताही नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांनी नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी अशाप्रकारे पैशाच्या आमिषाने आणखी काही लोकांना नोकरी लावली का? याचा तपास करण्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी नवगिरे यांनी केली.

शैलजा दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे यांनी एकुण 44 लोकांची फसवणुक केली आहे. काही लोकांना टीईटी पास करणे, शिक्षक पदावर, आरटीओ, तसचे तलाठी पदावर नोकरी लावतो सांगून मोठ्या रकमा स्विकारल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून त्या फरार झाल्या होत्या, त्यांना फरार होण्यास कोणी मदत केली ? त्यांनी रकमेची कोठे विल्हेवाट लावली ? त्यातून त्यांनी वस्तु, जागा, सोने खरेदी केले आहे का? याचा तपास करायचा आहे. त्यांचा आणखी एक साथीदार गुन्ह्यात निष्पन्न झाला असून त्याला देखील अटक करायची आहे. या गुन्ह्यात दराडे यांचा मुख्य सहभाग असून त्यांच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पाहता त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी नवगिरे यांनी केली. याला बचाव पक्षाच्या वकीलांनी विरोध केला.

गुन्ह्यातील फिर्यादी, इतर फसवणूक झालेले साक्षिदार व शैलजा दराडे यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाचे कॉल रेकॉर्डिग जप्त करण्यात आले आहेत. तर दराडे यांचे व्हॉईस सॅम्पल घ्यायचे असल्याने त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news