निखिल जगताप :
बेलसर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह सर्वच पालखी सोहळ्यामध्ये लक्ष वेधून घेणारी फुलांची सजावट केली जाते. मनमोहक व भगवंताप्रती असलेली अपार श्रध्दा या पुष्प सजावटीच्या माध्यमातून दिसून येते. स्व. नानासाहेब भिकोबा गरुड यांचे कुटुंबीय गेली 39 वर्षे विनामूल्य ही सेवा देत आहे. आळंदी देवाची (ता. खेड) नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्व. नानासाहेब भिकोबा गरुड यांनी 39 वर्षांपूर्वी माउलींची पालखी पुष्प सजावट सेवेचे व्रत घेतले होते. त्यांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र व पुतणे संदीप, प्रदीप, सुदीप, विठ्ठल, अमोल गरुड, नातु देवेंद्र हिरे हे सजावटीसाठी अविरत सेवा देत आहेत. या मनमोहक पुष्प सजावटीमुळे पालखी सोहळ्यास एक वेगळा रंग आला आहे.
गेली अनेक वर्षे श्री संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदी ते पंढरपूर व पुन्हा पंढरपूर ते आळंदी असा तब्बल 32 दिवसांचा पायी प्रवास करीत असताना नियमित पालखीची पुष्प सजावट गरुड कुटुंबीय हे स्व:खर्चातून करीत असतात. त्याच अनुषंगाने सासवड (ता. पुरंदर) येथे विठ्ठलाची कलाकृती उभारताना दिसत आहेत. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पालखीची नियमित पहाटे तीन ते पाच या वेळेत पालखी व रथ विविध रंगीत फुलांनी सजवण्याचे काम करण्यात येते. तब्बल 12 तास अथक प्रयत्न करून पालखी व रथ सजवला जातो.
सोहळ्यात दररोज फुले पोचवले जातात. पालखीत सर्व सुगंधी आणि आकर्षक फुलांची सजावट असते. या सजावटीसाठी पुणे येथील मार्केट यार्डमधून दररोज फुलांची खरेदी करून पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचवली जाते. जवळपास 10 ते 15 कारागीर सजावटीचे काम पाहतात. प्रशांत दिघे, अमोल हगवणे, काळुराम थोरात सोहळ्यातील संपूर्ण सजावटीचे नियोजन करतात.
रथावर साकारतात विशेष कलाकृती
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या रथावर प्रामुख्याने फुलांच्या सजावटीमध्ये विशेष प्रतिकृती तयार केल्या जातात. त्यामध्ये माउली, कैवल्य, ज्ञानोबा, ज्ञानदेव, ज्ञानराज व विठ्ठलाचे प्रतिकृती साकारण्यात येते. प्रस्थानाच्या दिवशी पांडुरंग भगवंत यांची प्रतिकृती रथावर साकारण्यात आली होती. सासवड येथे विठ्ठलाची प्रतिकृती व मोर यांचा विशेष देखावा फुलांच्या सजावटीमध्ये करण्यात आला होता.
25 ते 30 प्रकारच्या फुलांचा वापर
कॉर्नेशन, जिप्सो, ऑर्किड, अँथोरियम, लीलियम, गुलाब, शेवंती, दोन प्रकारचे झेंडू, लीली या फुलांचा विशेष वापर केला जातो. पादुका व पालखी सजावटीसाठी तुळस, मोगरा, तगर, सोनचाफा या फुलांचा वापर केला जातो.
ग्रीनरीसाठी वापरण्यात येणार्या वनस्पती
कामिनी, सोनम, सोनाप्पा, जेसीना, मनी प्लांट व इतर हिरवळीच्या वनस्पतींचा उपयोग केला जातो.
सन 1984 पासून आमचे कुटुंब हे पुष्पसजावटीचे काम करतात. भगवंताची व माउलींची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाल्याने आत्मिक समाधान मिळते. पालखी सोहळा नयनरम्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच आम्ही अविरत सेवा देत राहाणार आहोत.
– विठ्ठल गरुड
हे ही वाचा :