खेड : पुढारी वृतासेवा : तालुक्यातील लोटे येथे दि. २५ रोजी खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना दापोली व चिपळूण वन परिक्षेत्रातील वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. खवल्यांच्या तस्करी प्रकरणी आणखी तिघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्या पैकी तिघांना न्यायालयात हजर केले असता दि.३० पर्यंत न्यायालयाने वन विभागाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
याप्रकरणी आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. संशयितांत एका महिलेचा देखील समावेश असून मुंबई येथील एकाला अटक केली आहे, अशी माहिती वनविभागाचे दापोली परिक्षेत्र वनअधिकारी पी. जी. पाटील यांनी शुक्रवारी ( दि.३०) रोजी खेड येथे पत्रकार परिषदेत दिली. मिलींद वसंत सावंत ( वय ५५ राहणार मालाड, मुंबई), सौ. मिना मोहन कोटिया (वय ६२ राहणार लोटे, ता. खेड), राजाराम पगारे (वय ६८, रा.मुंब्रा, मुंबई), योगेश युवराज निकम (वय २७, रा. बीजघर कातकरी वाडी) व श्रीकांत तानाजीराव भोसले (वय ५७, रा. बीजघर मावळतवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, खेड तालुक्यातील लोटे येथे रविवारी (दि.२५ ) रोजी सायंकाळी ४.०० वाजण्याच्या सुमारास महामार्गावर दोन संशयित व्यक्ती आढळून आले. अधिक चौकशी केली असता सदर दोन व्यक्तींच्या बॅगेमध्ये खवले मांजराची खवले असल्याचे आणि ते विक्रीसाठी तेथे आले असल्याची माहिती मिळाली. यानंतर दोघांना वन विभागाने ताब्यात घेतले. यामध्ये मिलींद वसंत सावंत व सौ. मिना मोहन कोटिया या दोघांकडून खवले मांजर या प्राण्याचे ०.९३० किलोग्रॅम इतके खवले जप्त केले आहेत. सदर दोन्ही आरोपींना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यानंतर दि.२८ रोजी मुंबईतील मुंब्रा येथून राजाराम पगारे याला वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दि.३० पर्यंत वन विभागाच्या कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली.
याप्रकरणी दि. २९ रोजी सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत तालुक्यातील बीजघर येथून योगेश युवराज निकम व श्रीकांत तानाजीराव भोसले यांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यापैकी योगेशने खवले मांजराला पकडुन त्याची हत्या केल्याचा संशय असून भोसलेने त्याच्याकडून खवले विक्रीसाठी घेतल्याचा संशय आहे.
या प्रकरणात वन विभागाच्या पथकातील विभागीय वन अधिकारी रत्नागिरी दिपक खाडे व मानद वन्यजीव रक्षक सातारा रोहन भाटे, यांचे मार्गदर्शन लाभले. या कारवाईत फिरते पथक रत्नागिरीचे परिक्षेत्र वनअधिकारी वैभव बोराटे, परिक्षेत्र वनअधिकारी चिपळूण राजश्री किर, वनपाल खेड सुरशे उपरे, वनपाल दापोली साताप्पा सावंत, वनपाल सावर्डे उमेश आखाडे, वनरक्षक शुभांगी गुरव, अशोक ढाकणे, अश्विनी जाधव, कृष्णा इरमले हे सहभागी झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा :