नाशिक: पुढारी वृत्तसेवा- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या व्हिडीओमुळे चौकशीचा ससेमिरा लागलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची सहाव्यांदा चौकशी करण्यात आली. बडगुजर यांनी पोलिसांना अपेक्षित उत्तरे दिली नसली, तरी पोलिसांनी केलेल्या समांतर तपासात फार्महाऊसवरील ती पार्टी २४ मे २०१६ रोजी झाल्याचे समोर येत आहे. मे महिन्यातच सलीम कुत्ता याचा पॅरोल संपला होता.
बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टीत नृत्य करीत असल्याचा व्हिडीओ आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यामुळे बडगुजर यांची चौकशी सुरु झाली आहे. बुधवारी (दि.२०) दुपारी तीनच्या सुमारास बडगुजर चौकशीसाठी हजर झाले. मात्र त्यांच्यासोबत वकिल नव्हते. बुधवारी देखील बडगुजर यांनी प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केल्याने पार्टीचा उद्देश गुलदस्त्यात राहिला आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या समांतर तपासात सलीम कुत्ता हा सन २०१२ ते २०१६ या कालावधीत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात होता. त्यास एप्रिल ते मे २०१६ या कालावधीत पॅरोल मिळाला होता. त्याच कालावधीत बडगुजर यांच्याविरोधात राजकीय आंदोलनामुळे गुन्हा दाखल झाला व ते एप्रिल महिन्यात कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. पोलिसांच्या तपासानुसार ही पार्टी २४ मे २०१६ रोजी आडगाव हद्दीत झाल्याची माहिती समोर येत आहे. पार्टी झाल्यानंतर सलीम कुत्ता हा कारागृहात हजर झाला व तेव्हापासून तो येरवडा कारागृहात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तसेच सलीम कुत्ता याचा जबाब घेण्यासाठी पोलिसांनी कारागृह प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर चौकशी केली जाईल, असे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी सांगितले.
जेवताना ओळख झाल्याचा अंदाज
बडगुजर व सलीम कुत्ता हे कारागृहात असताना जेवणाच्या वेळी एकत्र आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शहर पोलिसांनी कारागृह प्रशासनाकडून यासंदर्भात नोंदी मागवल्या असून त्यानंतरच दोघांची कारागृहातील भेट केव्हा, कशी व किती वेळ झाली याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
फार्महाऊसची पाहणी
ज्या फार्म हाऊसवर बडगुजर व सलीम कुत्ता यांची पार्टी झाली, त्या फार्महाऊसची पाहणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली आहे. तसेच हा फार्म हाऊस बडगुजर यांच्या नातलगांच्या नावे असल्याचे समोर येत आहे. तसेच या पार्टीचा मुळ व्हिडीओ शोधण्याचे प्रयत्न पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १८ जणांची चौकशी केली आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे या प्रकरणाशी संबंधित माहिती मागितली होती. त्यातून तपासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मुद्दे समोर आले आहेत. गुन्हे शाखा या प्रकरणी तपास करीत आहे.
– प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, गुन्हे
हेही वाचा :