अखेर तोरणा गडावरील वीजपुरवठा सुरळीत

अखेर तोरणा गडावरील वीजपुरवठा सुरळीत
Published on
Updated on

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : विजेअभावी दोन आठवड्यांपासून अंधारात असलेल्या तोरणा गडाचा वीजपुरवठा बुधवारी (दि. 3) सायंकाळी सुरू झाला. त्यामुळे रात्री गडावर विजेचा लखलखाट झाल्याचे दिसून आले. याबाबत दै. 'पुढारी'मध्ये बुधवारी 'तोरणा गड दोन आठवड्यांपासून अंधारात' असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत महावितरणच्या अधिकार्‍यांनी तातडीने हालचाली करून गडावरील वीजपुरवठा सुरू केला. महावितरणचे शाखा अभियंता संतोष शिंदे, विनोद थाटे, कर्मचारी राजेंद्र गावित, सूर्यकांत शिंदे, अमोल डांगे आदींनी गडावर धाव घेतली.

संबंधित बातम्या :

भल्या सकाळी ठेकेदाराने पुण्यातून नवीन रोहित्र आणले. जुने नादुरुस्त रोहित्र काढून त्या ठिकाणी दुपारी नवीन रोहित्र बसविले. मात्र, गडावर जाणार्‍या वीजवाहिन्यांत अचानक बिघाड झाल्याने वीजपुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे अभियंत्यांसह कर्मचार्‍यांना गडाच्या पायथ्याला वेल्हे गावापासून तोरणा गडापर्यंत धावपळ करावी लागली. अखेर सायंकाळी साडेपाच वाजता वीजपुरवठा सुरू झाला.
गडाला वीजपुरवठा करणार्‍या रोहित्रात बिघाड झाल्याने 20 डिसेंबरपासून गडाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गडावर येणार्‍या पर्यटकांसह गडावरील पहारेकरी, डागडुजीची कामे करणार्‍या मजुरांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत होते. सरत्या वर्षाच्या अखेरीस रोहित्राची दुरुस्ती करण्यात येणार होती. मात्र, तरीही रोहित्राचे काम रखडले होते. ज्ञानेश्वर वेगरे, रामभाऊ राजीवडे, विनोद दिघे,बापू साबळे, अशोक सावंत आदी कार्यकर्त्यांनी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

विजेमुळे पर्यटकांची संख्या वाढली
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवलेल्या राज्यातील अतिदुर्गम तोरणा गडावर स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहोचली आहे. त्यामुळे गडावरील डागडुजीच्या कामाला गती आली आहे, तसेच पर्यटकांचीही सोय झाली आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी जातीने लक्ष घालून काही तासांतच नवीन रोहित्र उपलब्ध केले. ठेकेदार अगरवाल एजन्सीने तातडीने नवीन रोहित्र बसवले. रोहित्र व वीज वाहिन्या दुर्गम ठिकाणी असल्यामुळे दुरुस्तीसाठी अडचणी येतात.
                       -विनोद थाटे, शाखा अभियंता, महावितरण तोरणा गड विभाग.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news