Children Health : वैशाख वणवा आणि मुलांचे आरोग्य

Children Health
Children Health

वैशाख महिना सुरू झाला की, उन्हाळ्याची दाहकता जाणवण्यास सुरुवात होते. तापमान आणि हवेतील आर्द्रता जास्त वाढल्यामुळे उन्हाळ्याशी निगडित आजारांचा धोका असतो. पण, आरोग्य आणि सुरक्षा यांच्याकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक वेळ घराबाहेर खेळण्यासाठी मुले आग्रह करत असतात. साहजिकच अशा वेळी मुले आजारी पडण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी काही उपाय.

मुलांनी दिवसभर पाणी पिणे महत्त्वाचे

उन्हाळ्यात मुले पुरेशा प्रमाणात पाणी पितात की नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांनी दिवसभर पाणी पिणे महत्त्वाचे असते. विशेषतः या दिवसांत शाळांना सुट्ट्या असल्याने मुले बाहेर खेळत असतात. अशावेळी पाण्याचे सेवन करतात का, पाणी कोणते पितात, या दोन्हींकडेही लक्ष दिले पाहिजे. फ्रीजमधील पाणी तात्पुरता गारवा देत असले तरी त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात, याची मुलांना कल्पना द्यावी.

ज्यूस आणि लिंबूपाणी

उन्हाळ्यात खेळणार्‍या मुलांना जास्त घाम येतो आणि त्यावाटे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. शक्य असल्यास मुलांना साध्या पाण्याबरोबर फळांचा ताजा रस, नारळपाणी, ताक, लिंबूपाणी अधिक प्रमाणात प्यायला द्यावे. कोकम, सरबताचा पर्यायही उत्तम ठरतो. याखेरीज इलेक्ट्रॉलचे पाणी, ओआरएसचे पाणीही देता येईल.

फिक्या रंगाच्या कपड्यांचा वापर

उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियमित राहावे, यासाठी फिकट रंगाचे कपडे वापरावेत. गडद रंगाचे कपडे सूर्याची उष्णता शोषून घेतात, तर दुसरीकडे फिकट रंगाचे कपडे सूर्यप्रकाश शोषून घेत नाहीत. या दिवसांत घट्ट कपडे चुकूनही वापरू नका.

सनस्क्रीन

मुलांना उन्हात खेळायला परवानगी देण्यापूर्वी त्यांना सनस्क्रीन लावण्यास विसरू नका. सनस्क्रीन हानिकारक सूर्याच्या किरण आणि त्यापासून होणार्‍या त्रासापासून बचाव करतात. त्याशिवाय थेट ऊन लागू नये, म्हणून टोपी किंवा हॅट वापरायला सांगावी. मुलांसाठी टोपी वापरताना ती रुंदीला जास्त असावी आणि आरामदायक पद्धतीने बसेल. प्लास्टिकच्या टोपीमुळे रक्ताभिसरणावर दबाव पडतो.

जंक फूडपासून बचाव

उन्हाळ्याच्या काळात मुलांच्या आहाराकडेही लक्ष द्यावे. मुलांनी पिझ्झा, बर्गर, पास्ता यांसारखे मसालेदार जंक फूड अतिप्रमाणात खाऊ नये. मसालेदार पदार्थांमुळे शरीरातील उष्णता वाढते. त्याऐवजी टरबूज, खरबूज आणि किवीसारखी ताजी फळे खावीत. त्या सर्व ताज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असल्याने डीहायड्रेशन होत नाही.

डासांपासून सुरक्षा

मुलांना डासापासून बचाव करणारी क्रीम लावणे आवडत नाही; पण खेळण्यासाठी बाहेर जाताना डास चावणे आणि डासांपासून सुरक्षा यासाठी ते लावणेही गरजेचे असते. त्यामुळे हे क्रीम लावावे लागते. कारण, डास चावल्याने संसर्ग होतो. त्याशिवाय मुलांचे डास आणि उष्णता यापासून सुरक्षा करण्यासाठी सुती, पण लांब बाह्यांचे कपडे घालावेत.

दुपारच्या उन्हापासून सुरक्षा

उन्हाळ्यात मुलांना सुरक्षित ठेवण्याचा सर्वात चांगली पद्धत म्हणजे त्यांना दुपारी 12 ते 4 दरम्यानच्या उन्हात बाहेर खेळायला जाण्यास मनाई करावी. यादरम्यान सावलीत किंवा घरीच खेळायला सांगावे. त्यासाठी घरात खेळ, कृतीत गुंतवावे. संध्याकाळी उन्हे उतरल्यावर बाहेर खेळण्यासाठी पाठवावे.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news