
पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या वाढत्या पेट्रोल आणि डिझेल दरामुळे देशभरात इलेक्ट्रिक बाईक आणि कारची मोठी चर्चा आहे. भारतात ई कार आणि बाईकला मिळणारा प्रतिसाद पाहून मागील महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक कार टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांना भारतात ई-कार उत्पादनासाठी निमंत्रणही दिले होते. मात्र त्यांनी आशियामध्ये टेस्लाचे उत्पादन चीनमध्ये करण्याचा मानस यापूर्वी व्यक्त केला आहे. आता त्यांनी भारतात टेस्ला कारची विक्री ( Tesla in India ) केव्हा सुरु होणार? या प्रश्नाचे उत्तर ट्विटरच्या माध्यमातून दिलं आहे.
एलन मस्क यांनी म्हटलं आहे की, "आम्हाला कार विक्री आणि सेवा देण्याची परवानगी मिळालेला नाही, अशा देशात आम्ही टेस्लाचे उत्पादन करणार नाही". त्यांच्या या विधानातून त्यांनी केंद्र सरकारकडे टेस्लास भारतात प्रथम विक्री आणि सेवा सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी अप्रत्यक्ष मागणीच केली असल्याचे मानले जात आहे.
केंद्र सरकारने मस्क यांना यापूर्वीच टेस्लाच्या निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचे निमंत्रण दिले होते . यासंदर्भात मागील महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की, भारतात ई-मोटार क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. एलन मस्क यांना भारतात मोठी बाजारपेठ आहे. चीन एवढेच गुणवत्ता असणारी विक्रेता आणि ऑटोमोबाईल स्पेअर पार्टही भारतातकडे आहेत. त्यामुळे एलन मस्क यांना टेस्लाचे उत्पादन भारतात करुन त्याची विक्री करणेही सोपे जाईल. मात्र त्यांना चीनहून कारची आयात करतात येणार नाही, अशी अटअसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तर मस्क यांनी भारतात सर्वप्रथम टेस्लाची विक्री आणि त्यानंतर कार उत्पादन करण्याचा मानस व्यक्त केला होता.
सूत्राच्या माहितीनुसार, भारतात ४० हजार डॉलर ( सुमारे ३१ लाख रुपये ) किंमतीपेक्षा अधिक इलेक्ट्रिक वाहनांसाठी १०० टक्के कर आकारला जातो. त्यापेक्षा कमी किंमतीच्या वाहनांवर ६० टक्के कर आकारला जाण्याची तरतूद आहे. यानुसार मस्क यांनी भारतात टेस्लाची विक्री किंमत ही सर्वाधिक असणार आहे. यापूर्वीही मस्क यांनी भारतात वाढीव आयात शुल्क व अन्य समस्यांचा पाढ वाचला होता. सध्या त्यांची केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरु असून, काही मुद्यांवर लवकर सहमती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
हेही वाचा :