गडचिरोली : पती, मुलगा आणि सुनेदेखत रानटी हत्तीने घेतला महिलेचा जीव

Kaushalya Mandal
Kaushalya Mandal

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा – शेतात आलेल्या रानटी हत्तीपासून जीव वाचवत गावाकडे परतत असलेल्या महिलेस एका हत्तीने हल्ला करुन ठार केले. पती, मुलगा आणि सुनेच्या डोळ्यांदेखत हा प्रकार घडला. ही घटना शुक्रवारी (ता.२९) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे घडली. कौशल्या राधाकांत मंडल (वय ६३) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या-

शंकरनगर येथील राधाकांत मडल यांची गावापासून एक किलोमीटर अंतरावर शेती आहे. शेतात मत्स्यपालनाचे तळे आहे. शिवाय त्यांनी मका लागवडही केली आहे. राधाकांत मंडल हे पत्नी कौशल्या, मोठा मुलगा हरदास आणि सून भगवती यांच्यासह शेतात असलेल्या घरात वास्तव्य करतात. शुक्रवारी रात्री जवळपास २० ते २५ रानटी हत्तींचा कळप घराशेजारी आला. यावेळी कवेलूच्या झोपडीत हरिदास आणि त्याची पत्नी होती. तर स्लॅबच्या घरात राधाकांत मंडल आणि कौशल्या मंडल हे झोपले होते. हत्तींनी सुरुवातीला झोपडीची नासधूस केली. हे लक्षात येताच हरिदास आणि त्याच्या पतीने कसेबसे झोपडीतून बाहेर येऊन दुसऱ्या घरात झोपलेल्या आई-वडिलांना उठवले.

त्यांच्यासोबत गावाकडे जाण्यास निघताच एका हत्तीने कौशल्या मंडल यांच्यावर हल्ला करुन त्यांना ठार केले. पती, मुलगा आणि सुनेही हा थरार प्रत्यक्ष पाहिला. त्यानंतर आज वनाधिकाऱ्यांनी पंचनामा केला. दोन दिवसांपूर्वीच शंकरनगर नजीकच्या पाथरगोटा येथे या हत्तींनी अनेक घरांची मोडतोड केली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

तीन महिन्यांत चौथा बळी

मागील तीन महिन्यात रानटी हत्तींच्या हल्ल्यात चार जण ठार झाले आहेत. १६ सप्टेंबरला आरमोरी तालुक्यातील पळसगाव-डोंगरगाव रस्त्यावर एका हत्तीने सुधाकर आत्राम नामक वनविभागाच्या वाहनचालकास ठार केले होते. १७ ऑक्टोबरला गडचिरोली तालुक्यातील दिभना येथील शेतकरी होमाजी गुरनुले, तर २५ नोव्हेंबरला गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथील मनोज येरमे नामक शेतकऱ्यास रानटी हत्तींनी ठार केले होते. त्यानंतरची ही चौथी घटना आहे.

रानटी हत्तींच्या हल्ल्यांना वनविभाग जबाबदार: कॉम्रेड अमोल मारकवार

आरमोरी आणि गडचिरोली तालुक्याच्या काही भागात रानटी हत्तींनी धुमाकूळ घातला आहे. घरे आणि पिकाच्या नुकसानीबरोबरच चार जणांचा जीव घेतला आहे. यासाठी वनविभागाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड अमोल मारकवार यांनी केला. वनविभागाकडे असलेला ड्रोन कॅमेरा नादुरुस्त असल्याने हत्तीचा वावर कुठे आहे, हे कळू शकले नाही. वनाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना हत्तींबाबत कुठलीही सूचना दिली नाही. शिवाय हत्तींना पिटाळून लावण्यासाठी पारंगत व्यक्तींचा चमू नाही. त्यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत आहे, असा आरोप अमोल मारकवार यांनी केला. शिवाय पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केवळ २५ हजार रुपये मदत देण्याची तरतूद प्रचंड अन्यायकारक असल्याची टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news