नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य पोलिस दलातील १२९ पोलिस निरीक्षक, ७३ सहायक निरीक्षक आणि २१२ उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये नाशिक शहरातील 10 निरीक्षक, 12 सहायक निरीक्षक, 19 उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यातील अधिकाऱ्यांची सर्वाधिक नियुक्ती ठाणे शहरात करण्यात आली आहे.
पोलिस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी अकार्यकारी पदावर बदली झालेले पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, राजू पाचोरकर, विजय पगारे, नितीन पगार, बाबासाहेब दुकळे, गणेश न्याहदे, पंकज भालेराव यांची ठाणे शहरात, तर श्रीकांत निंबाळकर यांची पुणे शहरात, तुषार अढावू व पवन चौधरींची छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे संजय तुंगार यांची महाराष्ट्र पोलिस अकादमी, पिंपरी चिंचवडचे बडेसाब नाईकवाडे, पुणे येथील जयराम पायगुंडे, अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर, ठाणे येथील समाधान चव्हाण, श्रीनिवास देशमुख, छत्रपती संभाजीनगर येथील आम्रपाली तायडे, गणेश ताठे, अशोक गिरी, सुशील जुमडे या सर्वांची नाशिक शहर आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.
पदभाराकडे लक्ष
नुकत्याच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा बदली झाल्याने गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा यांची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोणाची नियुक्ती होते तसेच पोलिस ठाण्यांच्या प्रभारींमध्येही बदली होते का, याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.
शहरात नव्याने तीन सहायक निरीक्षक
नाशिक शहरातील सहायक निरीक्षक अनिल जगताप, वसंत खतेले, विष्णू भोये, प्रकाश गिते, प्रमिला कावळे, संजय बिडगर यांची ठाणे शहर, तर शंकरसिंग राजपूत यांची छत्रपती संभाजीनगर, विनायक अहिरेंची पुणे शहर, साजिद मन्सुरी व किशोर खांडवींची मुंबई शहर यासह छाया देवरे व सुवर्णा हांडोरेंची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती केली आहे. तर पिंपरी चिंचवडच्या स्वप्नाली पलांडे, पुणे येथील निखिल पवार, बापू रायकरांची नाशिक शहरात नियुक्ती केली आहे.
पोलिस उपनिरीक्षकही दाखल
नाशिक शहरातील पोलिस उपनिरीक्षक भूषण देवरे, धनश्री पाटील, अपेक्षा जाधव, संजय भिसे, रामदास भरसट, ज्ञानेश्वर शेळके, हसन सय्यद, विलास मुंढे, उत्तम सोनवणे, प्रियंका बागूल, अनिल पाडेकर, अश्विनी उबाळे, नाईद शेख, प्रकाश कातकाडे, लियाकखान पठाण, सूर्यकांत सोनवणे, बाळू वाघ, वैशाली मुकणे व नारायण गोसावी यांची बदली झाली आहे. तर शहरात शेख निसार शरीफ, कैलास जाधव, इनकसिंग घुणावत, संदीप शेवाळे, मुक्तेश्वर लाड, मयूर निकम, शेषराव चव्हाण, युवराज शिरसाठ, गजानन इंगळे, उद्धव हाके, सुनील चव्हाण, प्रभाकर सोनवणे, रोहित गांगुर्डे यांच्यासह पुण्यातील माया गावडे, अजित शिंदे यांची नाशिक शहरात नियुक्ती करण्यात आली आहे.