चुकीच्या करामुळे 34 गावांत जनआक्रोश; कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा | पुढारी

चुकीच्या करामुळे 34 गावांत जनआक्रोश; कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : मिळकतकराच्या चुकीच्या आकारणीमुळे नागरिकांवर मालमत्ता विकण्याची वेळ आली आहे.
याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 34 गावांत जनआक्रोश आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. तसेच, कराची वसुली बंद न केल्यास गावोगावच्या पालिका कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा सर्वपक्षीय हवेली तालुका नागरी कृती समितीने दिला आहे. वडगाव बुद्रुक येथे झालेल्या कृती समितीच्या बैठकीत अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, शेखर मोरे, संतोष ताठे, विलास मते, पोपटराव खेडेकर, अमर चिंधे, संदीप चव्हाण, अतुल दांगट, राहुल पायगुडे, संदीप तुपे, अतुल धावडे, प्रवीण दांगट, शिवाजी मते, संजय धावडे, दिनेश कोंढरे, सुहास भोते, नितीन चांदेरे आदींसह शंभरहून अधिक पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले होते.

याबाबत कृती समितीने पालिका आयुक्त विक्रम कुमार, करसंकलनप्रमुख माधव जगताप यांना निवेदन दिले आहे. शिवणे , धायरी, नर्‍हे आदी ठिकाणी लाखो रुपयांच्या मिळकतकराची आकारणी करण्यात आली आहे. पालिका करवसुलीसाठी मालमत्तांना टाळे लावत आहे. आम्हीही आता गावोगावच्या करवसुली कार्यालयांना तसेच पालिकेला टाळे लावू. उपाध्यक्ष पोपटराव खेडेकर म्हणाले, अनेकदा निवेदने देऊनही प्रशासन सुस्तावले आहे.

शास्ती माफ करावी

कराची आकारणी करताना नियमानुसार नोंदणी करावी, जागेवर येऊन मोजणी करावी, शहरातील मध्यवर्ती पेठेतील दर न लावता स्थानिक दर आकारणी करावी. गावांतील शास्तिकर माफ करावा तसेच विनाव्याज वार्षिक कर घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नियम, कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. मिळकतकरात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे भरमसाट करवसुली सुरू आहे.

– अमर चिंधे, माजी सरपंच, आंबेगाव

हेही वाचा

Back to top button