मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी 'एका विशेष भेटीत संवाद साधला. आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये चांगले रस्ते, पायाभूत सुविधा, प्रवासी वाहतुक व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चित्रपटांना जीएसटीमधून सूट, ज्येष्ठ कलाकारांसाठी मानधन योजना, त्यांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठ कलाकार, वादक, तंत्रज्ज्ञ आदींना विमा संरक्षण याबाबत तसेच अनेक धोरणात्मक बाबींविषयी मंत्रालयात बैठक आयोजित करून संबंधित विभागांच्या समन्वयाने चर्चेतून मार्ग काढला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले. चित्रनगरीला भेट देऊन पाहणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
नाट्यगृहांची परिस्थिती सुधारणे, एकपडदा चित्रपटगृहांच्या समस्या तसेच चित्रपटांसाठी कर सवलत तसेच अन्य मुद्यांवरही विचारविनीमय, चर्चेने उपाययोजना केल्या जातील. संस्कृती, कला जोपासली गेली पाहिजेत. या गोष्टी संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील. समाजासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. यातूनच उत्तम कलावंत घडतील, ते देश आणि आपल्या राज्याचा नावलौकीक वाढवतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्या नाट्य, चित्रपट सृष्टीला गतवैभव पुन्हा मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील., असेही ते म्हणाले.
संवादा दरम्यान निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर प्रशांत दामले, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, वर्षा उसगांवकर, निर्माता विद्याधर पाठारे, मंगेश कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी, गायक अवधूत गुप्ते, विजय पाटकर, विजय केंकरे, प्रसाद ओक, चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रातिनिधीक स्वरूपात त्या-त्या क्षेत्रातील समस्या, मुद्यांची मांडणी केली.
हेही वाचा