पुढारी ऑनलाईन डेस्क: राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषदेची आज (दि. 10 सांगता झाली. हा भारतासाठी ऐतिहासिक 'सुवर्ण दिन' असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 'जग' जिंकले ! अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली आहे. G20 परिषदेतील भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी भरभरून कौतुक करणारी पोस्ट त्यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) केली आहे. (Eknath Shinde on G-20 Summit)
मुख्यमंत्री शिंदे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये अवतरले, हा एक सुवर्ण दिन होता. या परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी भारताची किर्ती जगभर पोहोचवली. भारताला महासत्ता बनविण्यासाठी ते अविरत परिश्रम घेत आहेत. पीएम मोदींनी मांडलेला 'दिल्ली जाहिरनामा' सर्व देशांनी एकमताने स्वीकारला. हे भारताचे राजनैतिक यश आहे." (Eknath Shinde on G-20 Summit)
'वसुधैव कुटुंबकम' ही संकल्पना घेऊन भारताने यशस्वीपणे जी-२० परिषद पार पाडली. मोदीजींच्या रूपाने भारताला प्रथमच राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला. शिखर परिषदेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि 'भारत' यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. हे देशाच्या इतिहासातले सोनेरी पान आहे. यामुळे पीएम मोदींची 'जागतिक स्तरावरचा नेता' अशी ओळख निर्माण झाली आहे. ही गोष्ट भारतासाठी अभिमानास्पद आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली संयुक्त जाहीरनामा एकमताने संमत केल्याच्या यशानंतर भारतातील महत्त्वाकांक्षी जी–२० परिषदेची आज (दि. १०) सांगता झाली. जी–२० परिषदेचे पुढील अध्यक्षपद ब्राझील भूषवणार असून, मावळते अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे अध्यक्षपदाचे प्रतीक असलेला वॉवेल सुपूर्द केला. यावेळी, भूक आणि दारिद्र्य याविरुद्ध संघर्षाला ब्राझीलचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन लुला दा सिल्वा यांनी केले. (G-20 Summit)