माेठी बातमी : शिंदे आणि फडणवीस सरकार बहुमत चाचणीत पास

माेठी बातमी : शिंदे आणि फडणवीस सरकार बहुमत चाचणीत पास
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने आज (दि. ४) विश्‍वासदर्शक ठराव जिंकत विधानसभेत बहुमत सिद्ध केले. ( Maharashtra govt floor test) शिंदे-फडणवीस सरकारच्‍या बाजूने १६४ सदस्‍यांनी मतदान केले. महाविकास आघाडीच्‍या बाजूने ९९ जणांनी मतदान केले.  शिंदे-फडणवीस सरकारने विश्‍वासदर्शक जिंकला. यामुळे गेली १३ दिवसांहून अधिक काळ चालेल्‍या सत्तासंघर्षाला आता विराम मिळाला आहे. काँग्रेसचे पाच सदस्‍य अनुपस्‍थित राहिले. तर तीन सदस्‍य तटस्‍थ राहिले.

( Maharashtra govt floor test) रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर बहुमताने विजयी झाले होते. त्यांना १६४ मते तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती. या निवडणुकीत नार्वेकरांनाच मत देण्यासाठी शिवसेना पक्षाने आपले सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांना व्हीप बजावला होता. हा व्हीप पक्षाच्या उर्वरित १६ आमदारांना देखील लागू असेल, असे व्हीपमध्ये म्हटले होते. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान करून शिवसेनेचा व्हिप पाळला नाही.

शिंदे गट हाच शिवसेनेचा अधिकृत विधिमंडळ पक्ष; विधानसभा अध्यक्षांचा निर्णय

शिवसेनेच्या ५५ पैकी ३९ आमदारांचे पाठबळ असलेल्या शिंदे गटालाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले आहे. शिवसेनेचे अजय चौधरी यांचे गटनेतेपद आणि सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोदपदही रद्द ठरवले होते.

शिंदे गटाला शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता

शिंदे गटाला शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता देत विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेला धक्‍का दिला होता. या निर्णयामुळे सेनेच्या १६ आमदारांना सोमवारी बहुमत चाचणीवेळी शिंदे गटाचा व्हिप मान्य करून सरकारच्या बाजूने मतदान करावे लागेल. त्यांनी शिंदे गटाच्या विरोधात मतदान केल्यास आदित्य ठाकरे यांच्यासह सेना आमदारांची आमदारकीच धोक्यात येऊ शकते. व्हिपविरोधात मतदान केले म्हणून विधानसभा अध्यक्ष त्यांना निलंबित करू शकतात. अर्थात त्यानंतर शिवसेना सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल. तसे शिवसेनेने आधीच जाहीर केले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news