ED raids in Rajasthan: राजस्थानमध्ये काँग्रेस नेत्यांवर ईडीची कारवाई, काँग्रेसची भाजपवर आगपाखड

ED raids in Rajasthan
ED raids in Rajasthan

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत यांना ईडीने समन्स पाठवुन चौकशीसाठी बोलावले आहे. तर राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटसारा यांच्या घरी छापे टाकण्यात आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यावर काँग्रेस मधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी २५ नोव्हेंबरला मतदान होत आहे. मतदानाला बरोबर एक महिना शिल्लक असताना ही कारवाई झाली आहे. (ED raids in Rajasthan)

अशोक गेहलोत यांचे पुत्र असलेले वैभव गेहलोत हे राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांना परकीय चलन व्यवस्थापन (फेमा) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने समन्स बजावले आहे. तसेच त्यांना २७ ऑक्टोबरला जयपूर येथे चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगितले आहे. कथित पेपर लीक प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील चौकशीचा भाग म्हणून राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग यांच्या घरी छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणात ईडीने राजस्थानमधील जवळपास डझनभर ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे. (ED raids in Rajasthan)

ईडीने केलेल्या या कारवाईवर काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 'निवडणुका आल्या की ईडी, सीबीआय, आयकर विभाग हे भाजपचे 'पन्ना प्रमुख' बनतात, राजस्थानमध्ये दिसत असलेल्या पराभवामुळे भाजप हे प्रयत्न करत आहे. आम्ही विविध संस्थांच्या दुरुपयोगाच्या विरुद्ध लढत राहू आणि भाजपाला ताकदीने उत्तर देऊ,' असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलाय.

ईडीच्या या कारवाईनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. 'राजस्थान काँग्रेसच्या अध्यक्षांवर ईडीचा छापा टाकला जातो, माझ्या मुलाला समन्स पाठवला जातो. राजस्थानच्या जनतेसाठी चांगल्या घोषणा केल्याच्या बरोबर एक दिवसानंतर ही कारवाई होते. राजस्थानच्या महिलांना, गरिबांना, शेतकऱ्यांना चांगल्या योजनांचा लाभ मिळू नये, हाच भाजपाचा प्रयत्न आहे. असे ते म्हणाले. तर भाजपाला आधी निवडणुका जिंकण्यासाठी नरेंद्र मोदींची मदत व्हायची. मात्र आता त्यांच्यामुळे काम होत नाही म्हणून ईडीला आणले जात आहे, अशी खोचक टीका काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात एक पत्रकार परिषदेत घेतली होती. यामध्ये बोलताना ते म्हणाले होते की, 'मी ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या प्रमुखांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे. मात्र त्यांनी मला वेळ दिलेला नाही. उलट त्यांचे अधिकारी मला भेटायला येणार असल्याचे सांगितले मात्र आले नाही.' असेही ते म्हणाले होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news