Asian Para Games : सिमरन वत्स हिचा ‘डबल रौप्य धमाका’! 100 नंतर 200 मीटर शर्यतीत जिंकले पदक | पुढारी

Asian Para Games : सिमरन वत्स हिचा ‘डबल रौप्य धमाका’! 100 नंतर 200 मीटर शर्यतीत जिंकले पदक

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Para Games : चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने चमकदार कामगिरी करत आतापर्यंत एकूण 80 पदके जिंकली आहेत, ज्यात 18 सुवर्ण, 23 रौप्य आणि 39 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत भारत सहाव्या स्थानी कायम आहे.

सिमरन वत्सने जिंकले दुसरे रौप्य पदक!

आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची धावपटू सिमरन वत्सने महिलांच्या 200 मीटर T12 फायनलमध्ये रौप्य पदक जिंकले. तिने 26.12 सेकंदांची वेळ नोंदवली. यंदाच्या स्पर्धेतील हे तिचे दुसरे पदक आहे. दोनच दिवसांपूर्वी तिने महिलांच्या 100 मीटर T12 स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले होते.

शॉट पुटमध्ये सचिन खिलाडीची सुवर्ण कामगिरी

पुरुषांच्या F-46 शॉट पुट स्पर्धेत सचिन खिलाडी याने 16.03 मीटर अंतरासह नवा विक्रम रचला आणि आजच्या दिवसातील (दि. 26) पहिले सुवर्णपदक जिंकले. नारायण ठाकूरने पुरुषांच्या T-35 100 मीटर स्पर्धेत कांस्यपदक जिंकून भारतासाठी चांगली सुरुवात केली. त्याने 14.37 सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले. श्रेयांश तिवारीने पुरुषांच्या T-37 100 मीटर प्रकारात 12.24 सेकंदाच्या वेळेसह कांस्यपदक जिंकले.

नित्या श्री हिला बॅडमिंटनच्या एकेरीत कांस्यपदक

नित्या श्री हिने बॅडमिंटनच्या एकेरी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. या कांस्यपदाकसह भारताच्या पदकांची संख्या 73 झाली आणि यासह एशियन पॅरा गेम्समध्ये नवीन इतिहास रचला गेला. 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने 72 पदकांची कमाई केली होती. यंदा हा विक्रम मोडीत निघाला आहे. पीएम मोदींनी देखील ‘नित्या श्री’ हिचे अभिनंदन केले आहे. या संदर्भातील पोस्ट पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून केली.

बुद्धिबळमध्ये हिमांशी राठीची कांस्यपदकावर मोहर

बुद्धिबळमध्ये हिमांशी राठी हिने चमकदार कामगिरी केली. तिने महिला बुद्धीबळ स्पर्धेत कांस्यपदकावर मोहर उमटवली.

काल भारताने विविध स्पर्धांमध्ये एकूण 30 पदके जिंकली. पुरुषांच्या F-64 भालाफेक स्पर्धेत सुंदर सिंगने 68.60 मीटर फेक करून नवा विश्वविक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक जिंकले. तर रिंकूने 67.08 मीटर फेक करून रौप्य कामगिरी केली तसेच अजित सिंगने 63.52 मीटर अंतरासह कांस्यपदक जिंकले. झैनाब खातूनने महिलांच्या 61 किलो पॉवर लिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून भारतासाठी 50 वे पदक जिंकले.

आशियाई पॅरा गेम्ससाठी भारताने 303 खेळाडूंची तुकडी पाठवली आहे. यातील खेळाडू विविध 17 स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. भारताकडून यंदा मागील गेम्सपेक्षा चांगली कामगिरी अपेक्षित आहे. 2018 मध्ये इंडोनेशियामध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने एकूण 72 पदके जिंकली होती ज्यात 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश होता.

Back to top button