मेक्सिको सिटी : मेक्सिकोचा पश्चिम भाग सोमवारी शक्तीशाली भूकंपाने (Earthquake in Mexico) हादरला. या भूकंपाची रिश्टर स्केलवर तीव्रता ७.७ इतकी होती. या भूकंपानंतर मांझानिलो शहरातील शॉपिंग मॉलचा काही भाग कोसळला. यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ज्या ठिकाणी या भूकंपाचा केंद्रबिंदू होता तेथील लोकांनी किमान २० सेकंदांपर्यंत भूकंपाने जोरदार हादरे बसल्याची माहिती दिली. या भूकंपानंतर पश्चिम किनारपट्टी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
या भूकंपाने अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. मेक्सिकोच्या पश्चिमेकडील मिचोआकन राज्यातील अनेक रुग्णालयांचे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका इस्पितळात काच पडल्याने एक व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे. मेक्सिकोच्या पश्चिम किनार्याजवळ आणि कोलिमा राज्याच्या मिचोआकानच्या सीमेजवळ हा भूकंप झाला. येथे प्रमुख बंदर मंझानिलो आहे, अशी माहिती अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण (USGS) ने दिली आहे.
अमेरिकेच्या पॅसिफिक त्सुनामी वार्निंग सेंटरने म्हटले आहे की, भरतीच्या पातळीपासून ३ मीटर (९ फूटापर्यंत) उंचीच्या लाटा किनारपट्टीवर आदळू शकतात. दरम्यान, काही प्रमाणात आलेल्या त्सुनामीमुळे मेक्सिकोच्या मांझानिलो बंदर भागात समुद्राचे पाणी रस्त्यावरुन वाहत असल्याचे दृश्य एका व्हिडिओतून समोर आले आहे. BNO News याबाबतचे वृत्त दिले आहे.
मेक्सिको सिटीमध्येही भूकंपाचे हादरे बसले. राजधानीचे शहर असलेल्या मेक्सिको सिटीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मुख्यतः मेक्सिकोच्या पश्चिम किनार्याला शक्तिशाली भूकंपाने हादरवून सोडले. याच दिवशी याआधी दोन विनाशकारी भूकंप झाले होते. आता पुन्हा झालेल्या भूकंपामुळे लोकांच्या त्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
१९८५ मध्ये ८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने राजधानी मेक्सिको सिटी हादरली होती. यामुळे हजारो लोकांचा बळी गेला होता. शेकडो इमारती कोसळल्या होत्या. यामुळे मोठे नुकसान झाले होते. २०१७ मध्ये मध्य मेक्सिकोमधील पुएब्ला शहरात ७.१ तीव्रतेच्या भूकंपाने सुमारे ३७० लोक मारले गेले होते. तर ४० हून अधिक इमारती कोसळल्या होत्या. (Earthquake in Mexico)
हे ही वाचा :